बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल – संजय राऊत

मुंबई : ३ सप्टेंबर – ‘बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल,’ असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बेळगाव महापालिकेसाठी आज निवडणूक होत असून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक लोकसभा पोट निवडणुकीत समितीचे शुभम शेळके यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही ३० च्या आपसाप जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची संधी आली आहे. मराठी म्हणून मतदान करा, एकजुटीने मतदान करा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच, बेळगाव पालिकेची निवडणूक आठ वर्षांनी होत आहे. बहुमताने मराठी सत्ता असणारी पालिका द्वेषबुद्धीने बर्खास्त केली, भगवा झेंडा काढण्यात आला. लोकशाहीची हत्या करणारी अशी अनेक कृत्य कर्नाटक सरकारने केली आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आज असून, या वेळची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. ५८ प्रभागात ३८५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाने सर्व प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीनेदेखील बहुसंख्य वॉर्डात आपले उमेदवार उभे केले आहेत.

Leave a Reply