बायकोला घरात आसरा दिला म्हणून नवऱ्याचा शेजारी महिलेवर चाकूहल्ला

चंद्रपूर : ३ सप्टेंबर – नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे बायकोने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरी आसरा घेतला. मात्र बायकोला घरात थारा दिल्याच्या रागातून पतीने शेजारी महिलेवर प्राणघातक हल्ला केला. कोंबडी कापण्याच्या सुरीने आरोपीने शेजारणीवर भररस्त्यावर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. दर्शना झाडे असे जखमी महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगावमध्ये राहणाऱ्या संघमित्र फुलाझले याचे काही दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाले. त्यामुळे पत्नीने शेजारी राहणाऱ्या दर्शना झाडे यांच्या घरी आसरा घेतला होता. मात्र पत्नीला आसरा दिला, याचा राग संघमित्र फुलझले याला आला होता.
शुक्रवारी फुलझले याने चांगलीच दारु ढोसली. त्यानंतर हातात कोंबडी कापण्यासाठी वापरली जाणारी सुरी घेऊन तो गावातील रस्त्यांवर फिरत होता. रस्त्यावर जो दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.
त्याच वेळी दर्शना झाडे ही महिला पान टपरीजवळ आली. संघमित्र याने आधी पानपटरी मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून पानटपरी धारकांने स्वतःचा बचाव केला. मात्र तिथे उभी असलेली दर्शना झाडे दिसताच त्याचा राग अनावर झाला. त्याने धाव घेत दर्शना झाडेच्या मान आणि कानाजवळ सुरीने वार केले. ती रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिसांना दिली. गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरु हे पोलीस जवानांना घेऊन घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या दर्शना झाडे हिला उपचारासाठी गोंडपिपरीला हलवले. आरोपीला ताब्यात घेतले. जखमीवर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास पीएसआय मोगरे, प्रफुल कांबळे, शामराव पूलगमकर, अमित गुरनुले, नीलरत्न उराडे, पवार करत आहेत.

Leave a Reply