८ महिन्याच्या चिमुकलीला लावण्यात आलेल्या रक्तामधून एचआयव्हीचे संक्रमण

अकोला : २ सप्टेंबर – अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या बालीकेला पांढऱ्या पेशी कमी झाल्याने , तिला लावण्यात आलेल्या रक्तामधून एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचा आरोप त्या चिमुकलीच्या नातेवाईकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार आठ महिन्यानंतर तपासणी केल्यावर उघडकीस आला. यासंदर्भात चिमुकलीच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी तक्रारी करून न्याय मागितला आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी पांढऱ्या रक्ताची आवश्यकता आहे ते तिला देणे गरजेचे असून अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आण्याचा सल्ला बालिकेच्या पित्याला देण्यात आला. ठरल्याप्रमाणे संकलीत केलेले रक्त आठ महिन्याच्या चिमुकलीला देण्यात आले परंतु काही केल्या तिचा ताप कमी होत नव्हता व पेशी वाढत नव्हत्या. त्यामुळे जास्त वेळ न दवडता बालीकेला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने बालिकेची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले. तपासणीअंती तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आई-वडिलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगितले तेव्हा दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी आली? ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तिही संक्रमित झाल्याचे संशय तिच्या माता पित्यांना आला. ह्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
रक्तदात्यांकडून रक्त घेतल्यानंतर त्या रक्ताच्या किमान पाच तपासण्या केल्या जातात, या बाळाला ज्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले तेव्हा तो निगेटिव्ह होता. ‘विंडों पिरियड’ दरम्यान हा प्रकार घडला बाळ पॉझिटिव्ह आले तेव्हा सदर रक्तदात्याची पुन्हा तपासणी केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला. हेच रक्त त्या बाळाला देण्यात आले हे निश्चित.
यासंदर्भात चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान जे दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एका संक्रमित व्यक्तिचे रक्त चिमुकलीला देण्यात आले. याची आता आरोग्य विभागाकडून चौकशी होणार आहे. मात्र अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे.

Leave a Reply