चंद्रपुरमध्ये पुन्हा जादूटोण्याच्या संशयावरून तिघांना बेदम मारहाण

चंद्रपूर : २ सप्टेंबर – जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या मिंडाळा गावात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून बहिण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण झाल्याची घटना उजेडात आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावातील ही घटना घडली आहे. अशोक कामठे (४० वर्षे) आणि यशोदा कामठे (३८ वर्षे) अशी मारहाण झालेल्या बहिण-भावाची नावं आहेत. आरोपींनी त्यांच्या ७० वर्षीय वयोवृद्ध आईला देखील मारहाण केली आहे.
फिर्यादी असलेल्या आईचे नाव इंदिराबाई कामठे आहे. पीडित आणि सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळे मयुरी सडमाके हिची प्रकृती सतत बिघडते असा आरोप करत प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम आणि चंद्रकला आत्राम यांनी यशोदा, इंदिराबाई यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
तर अशोक याला बांबू आणि बॅटने मारहाण केली, या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून ७ लोकांना मारहाणीची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply