काँग्रेसने पुन्हा एकदा पराभवाच्या बक्षिसासाठी तयार रहावे – प्रवीण दटके

नागपूर : २ सप्टेंबर – काँग्रेसने पुन्हा एकदा पराभवाच्या बक्षिसासाठी तयार रहावे, असा टोला भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी काँग्रेसला लगावला आहे. पंधरा वर्षांपूर्वी भाजपने काँग्रेसकडून सत्ता घेतली होती, तेव्हाचे शहर आठवा. रस्ते आठवा, पाण्याचे प्रश्न आठवा. शहर बसचा विषय आठवून बघा. रस्त्यावरील दिवे कसे होते ते आठवा. अनेक वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने शहराचा सत्यानाश केला. उपराजाधानीच्या शहराला एक मोठे खेडे बनविले.
काँग्रेसच्या अकार्यक्षमतेला कंटाळून लोकांनी भाजपच्या हातात सत्ता दिली आहे. भाजपने मोठ्या खेड्याला शहराचे स्वरूप दिले आहे. मुबलक पाणी, दर्जेदार रस्ते दिले आहेत. जनता भाजपवर खूश आहे. आज भाजपच्या काळातील, रस्ते, पूल, मेट्रो बघा. नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनत असल्याचे बघून काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. महापालिका निवडणूक तोंडावर येत आहे म्हणून काही तरी आरोप करीत सुटली आहे. राजकारणासाठी त्यांनी आरोप जरूर करावे. मात्र, अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण हे सगळे का करू शकलो नाही, याचे आत्मपरिक्षणसुद्धा करावे.
शेकडो गट आणि हजार तट असलेल्या काँग्रेसने इतर पक्षांबाबत बोलू नये. अंतर्गत वादामुळे पंजा गोठवावा लागला होता, ज्यांनी आपल्याच पक्षाचे ‘बी फॉर्म’ दोन – तीन जणांना दिले होते, ज्यांचे नगरसेवक त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना माईक फेकून मारत आहेत, ते महापालिकेत सत्तेत येऊन काय करणार हे जनतेला चांगल्या पद्धतीने ठावूक आहे. आधी तुमच्या पक्षातील मतभेद मिटवा. तुमच्या गटाला प्रदेश कार्यकारिणीत चांगली संधी मिळाली त्याबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठी कुणाला टार्गेट करू नका. नितीन गडकरी देशाचे नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करताना, आपण कोण आहोत? याचा एकदा विचार करण्याचा सल्हाही दटकेंनी दिला. महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. जनता कुणाला कोणते बक्षीस देणार हे मतपेट्यांतून स्पष्ट होईलच. थोडी कळ काढा. तोंडाची वाफ गमावू नका. पराभवाच्या बक्षिसाला तयार रहा, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

Leave a Reply