आता आसाम सरकारने केले राजीव गांधी उद्यानाचे नामांतर

दिसपूर : २ सप्टेंबर – आसाम सरकारकडून राजीव गांधी उद्यानाचं नामांतरण करण्यात आलंय. आता या उद्यानाचं नाव बदलून ‘ओरंग राष्ट्रीय उद्यान’ असं करण्यात आलंय. नामांतराच्या मुद्यावरून जोरदार राजकारण रंगलंय.
काँग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. राज्यात जेव्हाही पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा भाजप सरकारचा हा निर्णय रद्द करून या उद्यानाचं नाव राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान करण्यात येईल, असं काँग्रेसचे खासदार गौर गोगोई यांनी म्हटलंय.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते आणि कलियाबोर मतदारसंघाचे खासदार गौरव गोगोई यांनी राज्यातील सद्य भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. जेव्हा आसाममध्ये काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा पहिल्याच दिवशी आम्ही या पार्कचं नाव पुन्हा एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावरच असेल. भारतीय संस्कृती आपल्याला आसएसएसच्या विरुद्ध शहिदांचा सन्मान करणं शिकवते, असं गोगोई यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसाम मंत्रिमंडळानं बुधवारी राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून राजीव गांधी हे नाव हटवलं होतं. आदिवासी आणि चहा जनजाती समुदायांची मागणी ध्यानात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं, भाजप सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
या उद्यानाला १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर यालाच, १९९९ साली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं होतं. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेल्या या उद्यानात रॉयल बंगाल वाघ, डुक्करं (पिग्मी हॉग), भारतीय गेंडे आणि जंगली हत्ती यांसारखे अनेक जनावरांचा अधिवास आहे.

Leave a Reply