हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुलाची वडिलांच्या युक्तीमुळे सुटका

नागपूर : १ सप्टेंबर – सोशल मीडियावर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून विविध वयोगटातील पुरुषांशी मैत्री करायची, काही दिवस चॅट करुन त्यांना व्हॉट्सॲपवर न्यूड फोटो पाठवायला सांगायचे, त्यानंतर हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागायची. हनी ट्रॅपचा हा फंडा वापरुन देशभरात अनेक टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. नागपूरच्या सक्करदरा भागातील अशाच एका टोळीचा पर्दाफाश करुन पोलिसांनी टोळीतील एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या वडिलांच्या युक्तीमुळे त्याची सुटका झाली.
रौनक प्रभू वैद्य असं आरोपीचं नाव असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. टोळीतील तन्वयी नावाच्या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारल्यानंतर दोघांचे चॅटिंग सुरु झाले. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या आणि नंबर एक्स्चेंज झाले. अखेर व्हॉट्सॲपवर बोलणं सुरु झालं. गप्पा हळूहळू अश्लील विषयांकडे वळला. त्यानंतर तन्वयीने त्याच्याकडे नग्न फोटोची मागणी केली. तिच्या बोलण्याला भुलून त्याने आपले न्यूड फोटो तिला पाठवले आणि सुरु झाला खेळ.
एक मे रोजी पीडित तरुणाला अज्ञात मोबाईल नंबरवरुन फोन आला. आमच्याकडे तुझे नग्नावस्थेतील फोटो आहेत. ते व्हायरल करायचे नसतील, तर पैसे दे अशी धमकी देऊन आधी दीड हजार, नंतर पाच हजार आणि अखेरीस सहा हजार रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले.
बदनामीच्या भीतीने तरुण घाबरला होता. मात्र आरोपीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हा प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला आणि आरोपींना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी थेट तरुणाच्या घरी पोहोचला. वडील आणि काकांना त्याचे न्यूड फोटो दाखवून ‘तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीसोबत अश्लील चॅटिंग करतो’ असे सांगितले. प्रकरण मिटवायचं असेल, तर ५० हजार रुपये द्या, अन्यथा तुमची बदनामी करु, अशी धमकी दिली. वडिलांनी होकार देत त्याला मंगल कार्यालयात बोलावलं. त्याच वेळी त्यांनी सक्करदरा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. आरोपी पैसे घेण्यासाठी पोहोचताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Leave a Reply