सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

पटले – वट ले

आमचा सुपरवायजर “पटले” दुपारी मी जेवत असताना आला. माझे पाय पकडले, साहेब मला वाचवा म्हणून रडायला लागला….. अबे, ऐसा हुवा क्या? साहेब आपल्या पाण्याच्या कॅप्सुल ट्रक खाली तिघे जण आले आणि मरण पावले……
माझा तोंडात घातलेला घास…. तोंडातच् अडकला.
मुश्किलो पर तो दुनिया कायम है!
पटले माझा विश्वासातला सुपरवाईजर. मी आमच्या कारच्या ड्रायव्हरला स्कुटर घेऊन पाठवले. म्हटले मी जेवण करतो. तू तिथे तिघे जण कसे मरण पावले, एकदा स्पॉटवर बघून ये. ट्रक क्लिनर ला सांग ट्रक पाशी जास्त थांबू नको. दूर रहा. आणि पोलिस पोचले असतील पंचनामा करायला तर अंदाज घे, काय चालु आहे त्याचा. आणि लवकरात लवकर परत ये, आपल्याला बहुतेक औरंगाबादला जायचे आहे. ट्रक च्या ड्रायव्हरला बघ कुठे आहे. एव्हाना त्याने मला येवून भेटायला हवे होते. पळुन जाऊ नको म्हणा मी करीन त्याची व्यवस्था.
एवढे चालकाला कामाला लावून, पाठवून दिले. पटलेला वृत्तांत विचारला खरं सांग काय झाले ते!
पटले हा सुपरवायझर सांगु लागला. साहेब, मध्ये मध्ये मी हा पाण्याचा ट्रक चालवायचो, सगळ्यांच्या नकळत आज ड्रायव्हरचा काही दोष नाही. दोष माझा आहे. आज सुद्धा ड्रायव्हरला बसवून पाण्याने भरलेला ट्रक चालवायला घेतला. वळणावर अचानक, एक मोटरसायकलवाला ट्रिपल सीट वेगाने आला आणि टर्निंगवर मोटरसायकल कंट्रोल न झाल्याने, आपल्या सरळ जाणा-या ट्रक खाली आला. चुकी मोटरसायकल वाल्याची आहे. आपली नाही. पण माझ्याकडे “जड वाहन परवाना” नाही. ट्रक चालविण्याचे लायसन्स नसल्याने मी पळून आलो.
पटलेला म्हटले बाहेरच्या खोलीत थांब. पटलेकडे लायसन्स नाही ही सगळ्यात मोठी त्रुटी. गुन्हा दाखल झाला आणि पटले फसला तर तर जन्मठेपेची शिक्षा पण होवु शकणारी. त्याचा चालु सुखी संसाराची नासोडी होणार हे निश्चित. समोरची मरणारी पार्टी कशी? किती पावरबाज? ह्या क्षणाला अदमास नाही. तसेच कंपनीला सुद्धा मोठा भुर्दंड नाकारता येणार नव्हता. मी पटलेला सांगितले की आजच्या तारखेची ताबडतोब सुटीचा अर्ज दे. कारण काहितरी जबरदस्त टाक जेणेकरून तातडीने जाणे अपरिहार्य आहे आणि मला सुटी देणे भाग पडेल. आणि काही ही झाले तरी बोंबलू नको की तू मला झालेला प्रकार सांगितला आहे. मी माझ्या परीने तुला वाचवायचा प्रयत्न कसोशीने करतो. त्याने त्याप्रमाणे सुटीचा अर्ज दिला. मी मंजूर केला आहे अशी प्रतीलिपी त्याला दिली. होगा सो देखा जाएगा !
१५-२० मिनिटात निरिक्षणासाठी पाठविलेला, चालक आला. त्याने पण सांगितले मोटरसायकल ट्रिपल सीट, मुलगा आपल्या आईला आणि बायकोला घेऊन चालला होता आणि आपल्या ट्रक च्या खाली आला. प्रथमदर्शनी आपली चूक आहे असे वाटंत नाही. पोलिस नुकतीच पोहोचली आहे पंचनामा करण्यासाठी. ड्रायव्हर तिथे नाही पण क्लिनरला सांगितले आहे की लोकं जाळपोळ करण्याच्या पावित्र्यात नाही तर गाडी बरोबर राहा पण तोंड उघडू नको. आत्ताच आलोय सांग. आणि आल्या आल्या अपघात बघितला.
बहुतेक मी ठरविलेली दिशा बरोबर चालली आहे असे वाटंत होते. मी बरोबर निर्णय घेतोय, असे ह्या क्षणाला तरी वाटंत होते.
मी ऑफिसला फोन करून सांगितले की मी औरंगाबादला जात आहे. कोणाचा ही फोन आला तर सांगाल मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
ट्रिपल सीट म्हणजे पहिली चुक मोटरसायकल वाल्याची, पटले कडे लायसन्स नाही, मी पटलेला तिथून हालवायचा निर्णय घेतला. ह्या एका चुकीचा गैरफायदा आपल्याला मिळु शकतो व कंपनीचा “अधिकारीक ट्रक चालक” ह्याचे संगनमताने तोडगा निघू शकेल. असा कयास केला आणि ड्रायव्हर ला कार काढायला सांगितले. पटलेला सांगितले पट्कन तुझी बॅग भर, जाण्यापुर्ती. त्यात उशी चादर घेऊन ये. त्याला मागे झोपवला आणि आम्ही औरंगाबादला निघालो. औरंगाबाद ला पोचताच पटले ला सांगितले, आपल्या घरी मध्य प्रदेश ला निघून जा, त्याचे घरचा नंबर घेतला. आणि पटले वट ले. पुढील सुचने पर्यंत घरीच थांब. बाहेरपण जास्त फिरू नको. माझे औरंगाबादचे काम आटोपले. रात्री थोडे उशीराने घरी पोचलो.
घरी पोचल्या पोचल्या निरोप मिळाला. पोलिस स्टेशन ला बोलावले आहे. दिवसभराची चौकशी केली तर कळले की मरणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलातील आहे. आणि माझी दांदरली. म्हणजे पुढल्या चाली अतिशय सावधपणे खेळाव्या लागणार. त्याची आई आणि बायको ह्यांना घेवुन तो आपल्या गावी ट्रिपल सीट निघाला होता. माप माझ्या बाजुने पडंत होते. पोलिस दलातील व्यक्ती आणि ट्रिपल सीट ह्या माझ्यासाठी जमेची बाजू. मी वाट बघत होतो फोरेन्सिक लॅब रिपोर्ट चा. तो अतिशय महत्वाचा धागा असतो, अपघाती मृत्यूनंतर चा.
दुस-या दिवशी मी पोलिस ठाण्यात पोचलो तर आमचा ट्रक पहिले दृष्टिस पडला. पोलिस खुप शर्थीने आपली बाजू मांडत होते. मी शांतपणे सगळे ऐकुन घेतले. काल औरंगाबादला गेलो असल्याने, ट्रकचा अपघात हा प्रकार काल रात्री कळल्याचे सांगितले. आणि मला थोडा वेळ द्या. माझ्या माणसांना पण विचारतो आणि आपणाला सहकार्य करण्यास सांगतो. असे सांगून मी बाहेर पडलो.
एव्हाना ट्रक चा अधिकारीक चालक येवून मला भेटलेला. त्याला सांगितले तुला ही केस अंगावर घ्यावी लागेल. सुटका व्हायची पुर्ण शक्यता आहे. त्याने देखील घाबरंत घाबरंत होकार दिला. त्याला पटलेच्या खोलीवर पाठवून दिले, बाहेर निघू नको अशी ताकीद देऊन. त्याला माझ्या नजरेबाहेर जाऊ देणे धोक्याचे होते. आणि अधिकारीक चालक माझ्या शब्दाबाहेर नव्हता.
दोन तीन दिवसांचा कालावधी गेल्यानंतर फोरॅन्सिक लॅब चा रिपोर्ट आला. त्याची मुळ प्रत पहिले हस्तगत केली. फोरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे पोलिस दलातील मोटर सायकल चालवणारा हा दारु प्यायला होता. आणि दारुच्या प्रभावाखाली चालवीत होता. आणि प्रथमदर्शनी तीन लोकांचा मृत्यू, एक मोटरसायकल म्हणजे चालवणारा ट्रिपल सीट होता. हे दोन कारणं माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. फोरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे तिघांचा मृत्यू “जबर धडकीमुळे मार बसल्याने झाल्याचे” निष्पन्न झाले होते. हा रिपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता.
पोलिसांना हा रिपोर्ट एफआयआर ला संलग्न करण्यास सांगितला. पोलिसांनी नकार दिला. आतापर्यंत मी खरंच् खुप तणावाखाली होतो. आता मात्र थोडा तणावमुक्त झालो. कुठेतरी “पोलिसी खाक्या पहाड के नीचे आया था” ! आणि मला आपले पत्ते खेळायला जागा मिळाली. एव्हाना गाडीच्या ड्रायव्हरला शोधण्याचा पोलिसांचा तगादा रास्त होता.
आमच्या गाडीचा चालक तर तसाही गुन्ह्याचा साक्षीदार. गाडी चालवताना पटलेच्या बाजूला बसलेला. कायद्याने त्याने गाडी पटलेला चालवायला देवून, कंपनीच्या दृष्टीने गुन्हा केलेला. त्यामुळे बिचारा आपली नौकरी वाचवायला, त्याची भिस्त माझ्यावर. त्याला साक्ष देताना तो गाडी चालवत होता आणि अपघाताचा साक्षी म्हणून त्याची साक्ष नोंदविण्यात आली.
पोलिसांचे म्हणणे असे होते की जर हा फोरेन्सिक रिपोर्ट संलग्न केला तर पोलिसाच्या मुलांना मिळणा-या मरणोत्तर सुविधा मिळणार नाही. इन्शुरन्स चे पैसे पण मिळण्याची शक्यता शुन्य.
मी पोलिसांना सांगितले की मला कोणाचे वाईट करायचे नाही पण त्यामुळे माझे पण काही नुकसान होणार नाही. माझ्या चालकाला केसाचा धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने केस फाईल करण्याची विनंती केली. अन्यथा मला पण हा फोरेन्सिक रिपोर्ट सार्वजनिक करण्यावाचून दुसरा मार्ग राहणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी पोलिस नमले, नरमले, सामोपचाराप्रत आले. सगळे आलबेल सगळ्यांचे भले.
एक मस्तपैकी सगळ्यांना मांडवलीची ओली पार्टी दिली.एक साध्या अपघाताची केस, अनावधानाने झालेला अपघात, कोणाला ही शिक्षा होणार नाही, अशी कलमं लावून एकदम मवाळ केस उभी केल्या गेली. कलमं आता मला आठवत नाहीत. पण कोणालाही शिक्षा झाली नाही. मरणोत्तर फायदे, इन्शुरन्स चे पैसे सगळे काही त्यांच्या मुलांना मिळाले.
पोलिसाच्या मुलांना मरणोत्तर सवलती, मुभा, इन्शुरन्स मिळायला हवं ह्या मताचा मी. आणि त्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याने आणि संगनमताने ह्या केसचा सोक्षमोक्ष लागला आणि एका मोठ्या तणावातून मी मुक्त झालो. ट्रक सुद्धा एक नवा पैसा न देता मला पोलिसांनी परत केला. आणि मुख्य म्हणजे एक पैसा खर्च न करता केवळ कायद्याच्या छिद्रांचा वापर करून, सही सलामत सगळं पार पडले.
पटले ला फोन लावला की ताबडतोब कामावर रुजू हो !!!
देवा हे काम लवकर संपव रे बाबा ! देवाला मनोमन प्रार्थना केली !

ताजा कलम – कल्पित कथा

भाई देवघरे

Leave a Reply