खा. संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट

कोल्हापूर : १ सप्टेंबर – खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी ते राष्ट्रपतींसमोर मराठा आरक्षणाची कैफियत मांडून त्यातून मार्ग काढण्याचे साकडे राज्यपालांना घालणार आहेत. या शिष्टमंडळात राज्यातील सर्वच पक्षाचे खासदार सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
खासदार संभाजी छत्रपती हे उद्या २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.
यावेळी राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात येणार आहे. मराठा समाजाची स्थिती, त्यांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच आदी बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्या जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलिकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

Leave a Reply