नांदेड : १ सप्टेंबर – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. ही प्राथमिक माहिती असून अद्याप या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकलेला नाही.
बुधवार सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही महिला नक्की कोण होती याची माहिती समोर आलेली नसली तरी ती एक मनोरुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून पोलिसांचा एक ताफा पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत ही महिला दगडफेक करुन तिथून पसार झाली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राज्यामध्ये मंत्री असणाऱ्या चव्हाण यांच्या घडावर दगडफेक झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरामध्ये सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त असून महिलाचा शोध घेतला जात आहे. ज्यावेळी या महिलेने चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करणाऱ्या या महिलेने फेकलेला एक दगड हा घराच्या दर्शनीभागी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. ही महिला कोण होती तिने का दडगफेड केली या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.