सत्तेचा गैरवापराबद्दल सुप्रियाताईंनी त्यांच्या वडिलांना विचारावे – चंद्रकांत पाटील यांचा टोला

नागपूर : ३१ ऑगस्ट – नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे डिवचल्या गेलेल्या भाजपाने शिवसेनेला त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपाने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याची भावना सत्ताधारी पक्षांतून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही आमच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावरुनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
नागपुरात बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या पक्षांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे.. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला”.
करोनाच्या संभाव्य लाटेच्या धोक्यातही लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा काढणं चालूच आहे, जनतेचा जीव धोक्यात घालताय, अशा आशयाची अप्रत्यक्ष टीका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री जन आशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात, कोकणात जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली”.
तर शिवसेनेवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही हिंदुत्ववादी होती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. असती तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती”.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार ११ वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.
सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.

Leave a Reply