जर सरकार मंदिरे सुरू करणार नसेल, तर आम्हालाच सुरू करावी लागतील – चंद्रकांत पाटील

पुणे : ३० ऑगस्ट – भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. आजपासून लोक भावना दाबून ठेवणार नाहीत. कुलूप तोडून लोक मंदिरं खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आधी आंदोलकांना संबोधित केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मान नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असं आवाहन पाटील यांनी केलं.
मंदिरात जाण्यापासून हे सरकार थांबवू शकणार नाही. ते भूमिका घेत नाही असं नाही. प्रत्येकवेळी थपडा बसल्यानंतर हे सरकार भूमिका घेतं. माझं म्हणणं एवढंच आहे की, मंदिरे उघडल्याने तिसरी लाट येऊ शकते तर दारूच्या दुकानांना तिसऱ्या लाटेची भीती नाही का? दारू घरोघरी पोहोचवणाऱ्यांना कोरोनाची नाही का? तो जगभर फिरून तो दारू पोहोचवतो. त्याला कोरोना होत नाही. मग मंदिरांनाच कोरोना कसा होतो? कोरोना यांच्याशी बोलतो का? मंदिर सुरू केल्यानंतर तिसरी लाट येईल असं कोरोना सांगतो का? तिसऱ्या लाटेची काळजी घेतली पाहिजे, पण त्याची धाड मंदिरावर कसली?, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.
माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं आहे की याचं काटेकोर नियम पाळून मंदिर उघडावं. किती लोकांना प्रवेश द्यायचे? काय निर्बंध लावायचे? ते सरकारनं ठरवावं आणि मंदिर सुरू करावीत. दारुची दुकाने इंडस्ट्री आणि पब सुरू केले तसे मंदिरं सुरू करा. तिसऱ्या लाटेची भिती आहे तर सर्वच सुरू करा. फक्त मंदिरच बंद का?, असा सवालही त्यांनी केला.
गणेशोत्सव हा आपआपल्या ठिकाणी छोटा का होईना लोकं करणारच आहेत. गणेशोत्सव साजरा होणारच आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा होईल. मंदिर बंद करण्याचा त्याचा काय संबंध? भविष्यात काय होईल याची काळजी घेतली पाहिजे. ती केवळ भाविकांनीच घ्यायला हवी असं नाही, असं ते म्हणाले.

Leave a Reply