ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र – संजय राऊत

मुंबई : ३० ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. तर शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. त्याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला.
“ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टारगेट केलंय. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील,” असेही राऊत म्हणाले. तसेच “एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे,” असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
दरम्यान, राज्यातील मंदीरे उघडण्यात यावी, यासाठी भाजपाकडून आंदोलन केलं जातंय. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने काही राज्यांना येत्या काळातील सण-उत्सव लक्षात घेता करोना संसर्ग वाढू नये, याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या त्याच निर्देशांचे पालन करीत आहे. आणि मला वाटतंय की केंद्र सरकारदेखील हिंदुत्ववादी आहे, असं म्हणत टोला लगावला.
अनिल परब यांना ‘ईडी’ने मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली. नारायण राणे यांच्या अटके नंतर भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. राणे यांनीही शिवसेना नेत्यांना सोडणार नाही, असे विधान केले होते. राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता होत असतानाच परब यांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई सुडाने आणि ठरवून करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे.

Leave a Reply