अनैतिक प्रेम संबंधांतून महिला बौद्ध भिख्खुचा सहकारी भिख्खूने केला खून

नागपूर : ३० ऑगस्ट – सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपळा डाक बंगला या गावात एका महिला बौद्ध भिख्कूचा खून झाला आहे. तिच्या सहकारी भिख्कूनेच तिचा खून केला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कुसुम चव्हाण असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव रामदास झिनुजी मेश्राम असे आहे. कुसुम चव्हाण यांची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनैतिक प्रेम संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली आहे.
आरोपी भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास मेश्राम पिवळा डाक बांगला येथील शिवली बोधी भिख्कू निवासमध्ये राहायचे. त्यांनी त्याच परिसरात एक जागा देखील विकत घेतली होती. शनिवारी श्रामनेरी बुद्धप्रिया उर्फ कुसुम त्या ठिकाणी आल्या असता दोघांमध्ये वादविवाद झाला, ज्यातून कुसुम यांनी रामदास यांच्यावर भाजी कापण्याच्या चाकूने वार केला. त्यामुळे रामदास जखमी देखील झाले. कुसुम यांनी वार केल्यामुळे संतापलेल्या रामदास यांनी त्यांच्या जवळ असलेल्या हतोडीने कुसुम यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याच चाकूने तिचा गळा चिरून हत्या केली. या घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी रामदास मेश्राम यांना अटक केली आहे
रामदास मेश्राम यांनी कुसुम चव्हाण यांची हत्या केल्यानंतर दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही वेळा त्यांचा हा प्रयत्न फसला. पहिल्यांदा त्यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिलिंगचे हुक तुटल्याने ते खाली पडले. नंतर त्यांनी एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र त्यावेळी त्यांचे कपडे रक्ताने माखलेले दिसले. तेव्हा नागरिकांनी शिवली बोधी भिक्खू निवासात जाऊन पाहिले असता, कुसुम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. नागरिकांनी घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळ आले असता, नागरिकांनी आरोपी रामदासला पोलिसांच्या हवाली केले. खापरखेडा पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कुसुम सुनील चव्हाण आणि आरोपी रामदास मेश्राम यांनी कौटुंबिक वादाला कंटाळून संसाराचा त्याग केला होता. त्यामुळे त्याच्या नावापुढे श्रामनेरी बुद्धप्रिया उर्फ कुसुम, तर रामदास मेश्राम यांच्या नावापुढे भदंत धम्मानंद थेरो असे विशेषण लावण्यात आले होते. कुसुम या अमरावती जिल्ह्यातील तर रामदास हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १३ वर्षांपूर्वी दोघांनीही बौद्ध धम्म प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांचा परिचय झाला, पुढे या परिचयाचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

Leave a Reply