सब खेले, सब खिले – पंतप्रधानांची नवी घोषणा

नवी दिल्ली : २९ ऑगस्ट – पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हॉकीचा विशेष उल्लेख करत मेजर ध्यानचंद यांचे स्मरण केले. आणि सब खेले, सब खिले- ही नवीन घोषणा दिली. यासोबतच प्रतिभावान लोक हे आजचे विश्वकर्मा आहेत, असं ते कुशल नागरिकांबद्दल म्हणाले. यावेळी ऑलिम्पिकने मोठा प्रभाव निर्माण केला आहे आणि प्रत्येक कुटुंबात खेळावर चर्चा होतेय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. आज ध्यानचंद यांचा आत्मा आनंदी असेल. जगभरात भारताचा डंका वाजवण्याचे काम ध्यानचंद यांनी हॉकीतून केले होते. भारताच्या मुला-मुलींनी ४ दशकानंतर हॉकीला नवसंजीवनी दिली. आहे. कितीही पदकं जिंकली तरी सर्वाधिक आनंद हा हॉकीत पदक जिंकल्यानेच होतो. यावेळी भारताने पदक जिंकले आहे. ध्यानचंद यांनी खेळासाठी आपले जीवन वाहिले. आज त्यांच्या आत्मा प्रसन्न असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशातील आजच्या तरुण पिढीला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्याला रुळलेल्या रस्त्यांवरून जायचं नाहीए. नव्या मार्गावर जाण्याची त्याची इच्छा आहे. त्याचे ध्येय आणि मार्ग नवीन आहेत. काही काळापूर्वीच भारताने अंतराळ क्षेत्र खुले केले. तरुणांनी ही संधी मिळवली. तरुण पुढे आले. आगामी काळात असे उपग्रह असतील जे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तरुणांनी बनवलेले असतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्टार्टअप संस्कृती आता छोट्या शहरांमध्ये विस्तारत आहे. तरुणांना जोखीम घ्यायची आहे. भारतीय खेळण्यांना जगात स्थान उच्च स्थान मिळवून देण्याचा निश्चिय त्यांनी केला आहे. आज आपल्या देशातील तरुण त्याकडे लक्ष देत आहेत. यामुळे मन आनंदी आणि आत्मविश्वास वाढतोय. चालतंय ना… असा स्वभाव झाला होता. पण आता तरुण सर्वोत्तम बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, त्याला सर्वोत्तम काम करायचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
ऑलिम्पिकचा देशावर मोठा प्रभाव पडला. आता पॅरालिम्पिक सुरू आहे. जे घडले ते आत्मविश्वास जागृत करण्यासाठी पुरेसे आहे. प्रत्येक कुटुंबात खेळांची चर्चा सुरू झाली आहे. हे थांबायला नको. कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनात कायमस्वरूपी स्थान बनवावे लागेल आणि सतत नवी उर्जा निर्माण करावी लागेल. गावांमधील आणि शहरांची मैदानं भरलेली पाहिजेत. सर्वांच्या प्रयत्नांनी भारत क्रीडा क्षेत्रात नवी उंची गाठेल. मेजर ध्यानचंद जींनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जाण्याची आपली जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्या जन्माष्टमीचा मोठा सण आहे. कृष्णाच्या जन्माचा सण. खोडकर कन्हैयापासून ते विराट स्वरूपापर्यंत, आपण कृष्णाला शास्त्रापासून शस्त्रांच्या सामर्थ्याने ओळखतो. सोमनाथ मंदिराशी संबंधित कामांचे उद्घाटन या महिन्याच्या २० तारखेला करण्यात आले. त्याच्या जवळच एक मंदिर आहे, जिथे कृष्णाने जीवनाचा शेवटचा काळ घालवला. माझ्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी एक पुस्तक ठेवले होते, ज्यात कृष्णाची अप्रतिम चित्रे होती. मला हे पुस्तक देणाऱ्या व्यक्तीला भेटायचे होते. यावेळी अमेरिकेच्या जेदुराणी दासी या भेटल्या. त्या इस्कॉनशी संबंधित आहे. अमेरिकेत त्यांचा जन्म झाला. भारतीय भावांपासून दूर असूनही त्यांनी श्रीकृष्णाची मोहक चित्रे बनवली, हे विशेष.
भारताबद्दल काय वाटतं, असं आपण जदुरानी यांना विचारलं? भारत आपल्यासाठी सर्वकाही आहे. भारत तंत्रज्ञानात पुढे जात आहेत. पण भारताचा हा गौरव नाही. तर श्रीकृष्ण, शिव, राम हे इथे घडले. सर्व पवित्र नद्या इथे आहेत, वैष्णव संस्कृती इथे आहे, वृंदावन आहे आणि म्हणूनच मला भारतावर प्रेम आहे, असं त्यांनी सांगितलं.
जगातील लोक भारताच्या अध्यात्माशी इतके जोडलेले आहेत, त्यामुळे आपल्यालाही ते पुढे नेले पाहिजे. सण साजरा करू आणि त्याचे शास्त्र, संदेश आणि संस्कृती समजून घेऊ. आपण ते जगूया आणि हा वारसा येणाऱ्या पिढ्यांना देऊ, असं आवाहन त्यांनी केलं.
करोना संकटात स्वच्छतेला मागे पडू देऊ नका. स्वच्छ भारत अभियानात इंदूरचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. इंदूने विशेष ओळख बनवली आहे. स्वच्छ भारत रँकिंगमध्ये इंदूर अनेक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूरची नागरिक यावर समाधानी नाहीत, त्यांना आता काहीतरी नवीन करायचे आहे. त्यांनी त्यांच्या नाल्यांना मलनिस्सारण लाईनशी जोडल्या आहेत. यामुळे नद्यांमध्ये जाणारे घाण पाणी कमी झाले आहे. शहरांमध्ये जितकी जास्त स्वच्छता असेल तितक्या जास्त नद्या स्वच्छ राहतील. तिथे पाणी असेल आणि पाणी वाचवण्याचे संस्कार होतील, असं ते म्हणाले.
आयर्लंडचे के. एडवर्ड हे संस्कृतचे शिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवतात. डॉक्टर चिरापद आणि डॉक्टर सुषमा थायलंडमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार करत आहेत. रिशायाचे बोरिस हे मॉस्कोत संस्कृत शिकवतात आणि अनेक पुस्तकांचं भाषांतर त्यांनी केलं आहे. सिडनीत संस्कृत शाळेत विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवली जाते. या प्रयत्नांमुळे जागृती आली आहे. नव्या पिढीला वारसा देणं हे आपलं कर्तव्य आणि त्यांचा तो हक्क आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave a Reply