मुत्सद्दी कोरोना !!
एका नाटुकल्याने काल तक्रार केली , कि
“राजकारण्यांची रस्त्यावरची नाटकं चालतात
त्याने कोरोना होत नाही —
आणि आमच्या नाटकांवर मात्र बंदी !
हे काही बरोबर नाही ! “
त्याला बिचार्याला हे ठाऊक नाही , कि,
तुलना अशी कोणीही कोणाशीही करायची नसते!
आपल्याच हाताने आपली हजामत करायची नसते !
राजकारणी लोक सर्वशक्तिमान असतात !
प्रचंड पावर ‘फूल’ असतात !
त्यांच्याजवळ कोरोना फिरकत सुद्धा नाही !
कारण त्यालाही भीती ही आहेच ना !
त्यालाही आपलं भलबुरं कळतच ना !
आणि आपल्याच आश्रयदात्यावर उलटायला
तो काही माणूस नाही !!
तुम्ही नाटुकले म्हणजे कमालीचे पोकळ !
नकली ! आभासी ! खोटे !
त्या प्लेटोने तर आपल्या ‘रिपब्लिक’मधे
तुम्हाला स्थानही दिलं नव्हतं !
आणि इस्लाममधे तर तुम्ही ‘जायज’च नाही !
पण आमच्या ठोकशाहीत मात्र ,
ओ!सॉरी !सॉरी ! लोकशाहीत , लोकशाहीत !
तुमच्यावर बंदी नाही
हेच तुमचं नशीब समजा !
आणि उगाच करू नका तुमच्या
तक्रारीच्या गमजा !
कवी -- अनिल शेंडे