मेळघाटात एकाच कुटुंबातील १० जणांना विषबाधा, मुलाचा आणि वडिलांचा मृत्यू

अमरावती : २९ ऑगस्ट – मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातल्या डोमा येथे एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विषबाधेत मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाची आई अत्यवस्थ आहे. तसेच अन्य सात बालकांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रज्योतीच्या बियामुळे ही विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकाचवेळी या विषारी बिया खाल्ल्या का अन्य कोणत्या कारणाने यांना विषबाधा झाली याचे कारण अद्याप समोर आले नाही.
डोमा येथील बछले कुटुंबातील १० सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी चंद्रज्योतीच्या बियांमुळे विषबाधा झाली. त्यामध्ये मुलगा आयुष बछले (वय ७ वर्ष) याचा शुक्रवारीच मृत्यू झाला. तर इतर सर्वांना तातडणीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी सांयकाळी बुधराज बछले या कुटुंबप्रमुखाचाही मृत्यू झाला. तर बुधराज यांच्या पत्नी लक्ष्मी बछले या अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच इतर सात बालकांवर काटकुंभ आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्या बालकांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
बधले कुटुंबियांना चंद्रज्योतीच्या बियामुळे विषबाधा झाल्याचे हे उपचारा दरम्यान स्पष्ट झाले असले तरी, नेमक्या या बियांचे विष त्यांच्या शरिरात कशा प्रकारे आले. याची माहिती डॉक्टरांनाही अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय डॉक्टरांच्या साथरोग चमूने डोमा गावातील पाण्यासह इतर ठिकाणचे तपासणी केली आहे. मात्र या तपासणीत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे या विषबाधा प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस याचा सविस्तर तपास करणार आहेत.

Leave a Reply