मुख्यमंत्री शेतकऱ्याला भेटत नाहीत – सुप्रिया सुळेंच्या बैठकीत माजी आमदाराने व्यक्त केली खंत

र्धा : २९ ऑगस्ट – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे, असे असले तरी ग्रामीण पातळीपर्यंत सारेच आलबेल नसल्याचे वेळोवेळी उघड होऊ लागले आहे. वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीत याचा पुन्हा प्रत्यय आला. या बैठकीची विशेष चर्चा सुरु झाली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी बैठकीचे फेसबुक लाईव्ह केले, मात्र त्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने व्यक्त केलेल्या तडकाफडकी नाराजीने सुप्रियाताईंना फेसबुक लाईव्हचे व्हिडीओ डिलीट करावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत, अशी जाहीर नाराजी माजी आमदार राजू तिमांडे यांनी बोलून दाखवली.
एकीकडे राज्यातील वातावरण आधीच चांगलेच तापले आहे, विविध मुद्द्यांवरून महाविकास सरकारवर टीकेच्या फैरी झडत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्यामुळे वर्धा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. सरकार पातळीवर तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालत असले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अजून एकमत होऊ शकले नसलेले यावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी याच अस्वस्थतेतून आपली नाराजी जाहीर केली.
राज्यातील ओबीसी आरक्षणाचे भिजत घोंगडे आहे. हा मुद्दा निकालात निघत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. राज्यात सत्तेवर आपले सरकार असतानाही आपला वर्धा जिल्हा दुष्काळमुक्त होऊ शकलेला नाही. कोरोना विषाणूची चिंता दूर होत नाही, तोच जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत सध्यातरी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम घेऊ नका. शरद पवार यांनाही दिवाळीनंतरच इकडे पाठवा, अशा शब्दांत राजू तिमांडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तिमांडे हे हिंगणाघाटचे माजी आमदार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे चांगले वजन असून राष्ट्रवादी पक्ष पातळीवरही त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. त्यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राजू तिमांडे यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. सुप्रियाताई मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही औरंगाबादच्या सभेत म्हटला होतात. माझ्या बापाने रक्ताचे पाणी केले म्हणून आज राष्ट्रवादी जिवंत आहे. हे जर खरे असेल तर राष्ट्रवादी कुठे चाललीय, याचा विचार केला पाहिजे. केवळ शरद पवार यांच्यामुळेच राज्यात राष्ट्रवादी आहे तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण, मुख्यमंत्री बांधावरच्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. शरद पवार शेतकऱ्यांना भेटायचे, पण आताचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांनाच काय, कुणाला भेटत नाही, अशा शब्दांत तिमांडे यांनी खासदार सुप्रिया सुळेंसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.
वर्धा जिल्हा कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण सुरु केले होते. यावेळी तिमांडे यांचे नाराजीदर्शक भाषणही लाईव्ह प्रक्षेपित झाले. तिमांडे यांनी तक्रारींचा पाढा वाचणे सुरूच ठेवले होते, ते थांबतच नसल्याचे पाहून लगेच फेसबुक लाईव्ह थांबवण्यात आले. किंबहुना आधीच्या व्हिडिओमध्ये तिमांडेंचे भाषण कैद झाल्यामुळे तो व्हिडीओ लगेच डिलीट करण्यात आले.

Leave a Reply