केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर : २९ ऑगस्ट – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीला नागपुरात अपघात झाल्याची माहती आहे. छत्रपती चौकात गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानी रवाना झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली.
नितीन गडकरी सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह ते घरी रवाना झाले. छत्रपती चौकातील सिग्नलवर लागल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले एमएच-01-सीपी-2435 क्रमांकाचे वाहन ट्रकच्या मागील बाजूला धडकले. अपघातात ताफ्यातील कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकही वाहनातून बाहेर आले. तसेच पादचाऱ्यांनीही त्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती घेत नितीन गडकरी आपल्या घरी रवाना झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रतापनगर आणि धंतोली पोलिसांचा ताफा छत्रपती चौकात दाखल झाला.

Leave a Reply