एसडीएमनेच दिला शेतकरी आंदोलकांचा डोके फोडण्याचा आदेश? – व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : २९ ऑगस्ट – केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला जवळपास १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचा विरोध सुरु आहे. हरियाणा करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं. अशावेळी हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ वेगानं व्हायराल होत असून त्याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
करनालमध्ये पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावून, दांड्या बांधून रस्ते अडवले होते. ‘ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा. मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे. लिखित देतो. सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा. कोणतीही शंका नाही, कुठल्याजी आदेशाची गरज नाही. क्लिअर आहात तुम्ही. हा नाका कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुटू देणार नाही. आपल्याकडे पर्यात फोर्स आहे. १०० लोकांची फौज आहे. इथं तुम्हाला सुरुवातीच्या बंदोबस्तासाठी उभं केलं आहे. कोणतीही शंका नाही. करणार ना लाठीचार्ज? इथून एकही माणूस गेला नाही पाहीजे, असे आदेश देताना हे एसडीएम महाशय दिसून येत आहेत. दिल्लीचे आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
काँग्रेस नेते आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि हरियाणा सरकारचा निषेध केला आहे. मारा मारा शेतकरी आहेत, यांचं धाडस कसं झालं उद्योगपती सरकारकडून आपला हक्का झाला? छातीवर हात ठेऊन हा जय जवान आणि जय किसानच्या घोषणा देणारा भारत राहिलाय का? असा सवाल श्रीनिवास यांनी केला आहे.

Leave a Reply