अनिल परब यांना ईडीची नोटीस

मुंबई : २९ ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत वाद शिगेला पोहोचला असून या नाट्याचा आता नवा अंक सुरू झाला आहे. ‘जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले’ असा धक्कादायक खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसंच, यावेळी राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता’ असं म्हणत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसंच, अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यादिवशी अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये परब या पोलिसांशी संवाद साधत असल्याचं दिसून येत आहे.
नारायण राणे यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली. पण, त्याआधी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी अनिल परब यांनी पोलिसांना फोन केल्या असल्याचं दिसून आलं. या व्हिडीओमध्ये अनिल परब यांनी पोलिसांशी फोनवर संवाद साधला होता. नेमकं फोनवरील बोलणं माईकमध्ये रेकॉर्ड झालं.
परब यांना एका पोलिसांचा फोन आला होता. यावेळी परब यांनी पोलिसांनी राणे ज्या ठिकाणी आहे तिथली माहिती जाणून घेतली. त्यानंतर पुढे डीजींना बोलतो म्हणून सांगितलं.
हे बोलणं सुरू असताना भास्कर जाधव यांनी सत्र न्यायालयाने राणेंना जामीन नाकारला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर परब यांनी फोन लावला.
‘तुम्ही लोक काय करताय, पण तुम्हाला ते करावेच लागणार आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेता की नाही? ते ऑर्डर कसली मागत आहेत? कोर्टानेच आता नाकारलं आहे, हायकोर्टातही येणार नाही. त्यांना घ्या ना, पोलीस फोर्स वापरून करा, कोर्टबाजी चालूच आहे, वेळ लागणार आहे, असं परब यांनी फोनवरून समोर बोलणाऱ्या व्यक्तीला सांगितलं असल्याचं व्हिडीओवरून दिसून आलं.
त्यानंतर राणे यांनीही या व्हिडीओची दखल घेऊन योग्य वेळी हिशेब करणार असा इशारा दिला होता. आता अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी चिघळणार हे आता स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply