सिद्धू यांना त्यांच्या दोन्ही सल्लागारांना काढून टाकण्याचे काँग्रेसने दिले आदेश

नवी दिल्ली : २७ ऑगस्ट – पंजाब काँग्रेस प्रभारी हरिश रावत यांनी सिद्धू यांच्या मालविंदर सिंग माली आणि प्यारे लाल गर्ग या दोन्ही सल्लागारांना काढून टाकण्यास सांगितलं आहे. हे दोघेही गेल्या काही आठवड्यांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सातत्याने टीका करत आहेत.
वृत्तानुसार, हरिश रावत यांनी बुधवारी सांगितलं की, आम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांना त्यांच्या सल्लागारांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं. काँग्रेसचा सिद्धू यांच्या सल्लागारांशी काही संबंध नाही. मात्र राष्ट्रहिताविरोधात कोणतीही टिप्पणी सहन केली जाणार नाही.
सिद्धू यांचे हे दोन्ही सल्लागार गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मालविंदर सिंग माली यांनी काही दिवसांपूर्वीच काश्मीर हा काश्मिरी लोकांचा वेगळा देश असल्याचं वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. तर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानवर टीका केल्याने प्यारे लाल गर्ग यांनी ह्या विषयाचा पंजाबशी संबंध नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना सुनावलं होतं. माली यांनी काही दिवसांपूर्वीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं एक वादग्रस्त रेखाचित्र शेअर केलं होते. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
हरिश रावत यांनी नुकतंच जाहीर केलं की पंजाब विधानसभा निवडणुका या अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जातील. तेव्हापासून पंजाबमध्ये सिद्धू गट आणि अमरिंदर गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खटके उडत आहेत. यातून सिद्धू गटातले मंत्री आणि आमदारांनी अमरिंदर सिंग यांना हटवण्याची मागणी केली.
याबद्दल जेव्हा काही नाराज मंत्री आणि तीन आमदार हरिश रावत यांना डेहराडूनमध्ये भेटले, त्यानंतर रावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वेगळी पार्श्वभूमी आहे. आम्ही त्यांना भविष्याचा विचार करुन पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या हातात सगळ्या पक्षाचाच कारभार दिलेला आहे.

Leave a Reply