सख्ख्या चुलत भावाची हत्या कुणी केली? – विनायक राऊत यांचा सवाल

मुंबई : २७ ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या आरोपानंतर आता शिवसेनेनंही राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही प्रकरणांचा दाखला देत राणेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण येत्या काही दिवसात आणखी चिघळेल असं दिसतंय.
“केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची वेळच का यावी? याचा अभ्यास त्यांनी केला तर बरं होईल. महाडच्या न्यायाधीशांनी जे निर्बंध घातले आहेत यातून राणे चुकलेत हे स्पष्ट होत आहे. अपराध केला असेल तर मग पोलीस हे पकडणार आहेत.”, अशी टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले. “ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसाऱख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकलं आणि जाळलं याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असं मला त्यांना विचारायचं आहे.”, असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर “तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूस केली आहे का?” असे गंभीर आरोप त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केले. “राणेंचे बाकी काय धंदे चालतात हे आम्हाला उकरुन काढायचं नाही. पण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद आणि विधानसभेत नारायण राणे कुंडली केली होती आणि सभागृहात वाचून दाखवली होती त्याचा अभ्यास आता महाराष्ट्र सरकारला करण्यास सांगणार आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता काही आरोप केले होते. “आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.” असा इशारा त्यांनी दिला होता.
नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

Leave a Reply