संपादकीय संवाद – राजकीय आरोप करतांना मर्यादांचे उल्लंघन करू नका

तीन दिवसांच्या ब्रेकनंतर नारायण राणेंची जनाशीर्वाद आज पुन्हा सुरु झाली आहे, या जन आशीर्वाद यात्रेला सत्तासंघर्ष यात्रा का म्हणू नये? असा प्रश्न कुणालाही पडावा, जबाब शिवसेना आणि भाजपमध्ये आता सुरु झालेले आहेत.
आज शिवसेनेवर टीका करतांना सख्ख्या वाहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितले होते? असा सवाल शिवसेना नेत्यांना उद्देशून केला. तर विनायक राऊतांनी नारायण राणेंच्या चुलतभावाचा खून कुणी केला? असाही प्रश्न उपस्थित केला. दोनीही बाजू एकमेकांना आम्हाला तोंड उघडायला लावू नका असे इशारे देत आहेत. मी जर इतका गुन्हेगार होतो, तर बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री कसे केले? असा प्रश्न नारायणरावांनी शिवसेनेतील टीकाकारांना विचारला आहे. एकूणच राजकीय वादाला चांगलेच तोंड फुटले आहे.
सध्याच्या राजकारणात स्वच्छ चारित्र्य घेऊन कुणीही वाटचाल करू शकत नाही, असे म्हटले जाते. हमाममे सब नंगे होते हैं अशी एक म्हण आहे. ही म्हण किती यथार्थ आहे हे या मान्यवरांचे वाद ऐकले की लक्षात येते. ही परिस्थिती आजची आहे असे नाही तर खूप जुनी म्हणता येईल अशी आहे. मात्र आतापर्यंत सर्व राजकीय नेत्यांनी सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या होत्या. कुठे काय बोलावे याचे तारतम्य राजकीय नेते सांभाळत होते, हे वादविवाद बघता सर्वानीच पातळी सोडली की काय? अशी शंका घेण्यास वाव निश्चित आहे.
असे पातळी सोडलेले राजकारण कितपत योग्य आहे, याचा विचार महाराष्ट्रातील सर्वच राजकारण्यांनी करण्याची वेळ आलेली आहे. राजकारण हे सत्तेसाठी असते खरे, मात्र सत्ता हेच सर्वस्व ठेऊन चालत नाही. तिथेही साधनशुचिता आणि सभ्यतेच्या मर्यादा सांभाळणे गरजेचे असते. आपण समोरच्याला एक बोट दाखवले तर आपलीच तीन बोट आपल्याकडे असतात,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज आम्ही सर्वच ते भान विसरतो आहोत.
मात्र हे भान विसरून चालणार नाही, आम्हा सर्वानाच ताळ्यावर येणे गरजेचे आहे. अन्यथा सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य उद्या राजकीय अराजकाचे केंद्र बनलेले दिसेल तिथून लोकशाहीच्या शवपेटीवर पहिला खिळा ठोकला जाण्याची सुरुवात झालेली असेल, याची जाणीव सर्वानीच ठेवायला हवी. इतकेच आज सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply