विदर्भवाद्यांनी केला रास्ता रोको, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये उडाली धुमश्चक्री

नागपूर : २७ ऑगस्ट – स्वतंत्र विदर्भासाठी तसेच कोरोनाकाळातील वीज बिल माफी, इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. आंदोलनात विदर्भवाद्यांनी रास्ता रोखला आणि एसटी महामंडळाच्या बसेसही अडविल्या. बसची चाबी हिसकावत बस सेवा बंद पाडली. अशातच, पोलिसांनीही कार्यकर्त्यांना फरफटत उचलत ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाल्याचे चित्र होते.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले व प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वामध्ये गणेशपेठ बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलकांनी रस्ता अडवला. अगदी बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बसपुढे कार्यकर्त्यांनी आडवे पडून बस रोखल्या. कार्यकर्त्यांचे एकूणच कृत्य बघता पोलिसांनीही अँक्शन घेत आंदोलकांचे हातपाय धरून उचलून व्हॅनमध्ये कोंबले. आंदोलनादरम्यान, मुकेश मासुरकर यांनी चालकाकडून बसची चावी हिसकावून घेतली.
यामुळे बराच वेळपयर्ंत बस थांबून होती. पोलिस कारवाई करत असताना महिला पदाधिकारी ज्योती खांडेकर, सुनिता येरणे, रेखा निमजे, जया चातुरकर, वीणा भोयर, शोभा येवले, उषा लांबट, संगीता अंबारे यांनी बससमोर आडवे पडून मार्ग रोखला. सुमारे अर्धा ही पकडापकडी सुरू होती. दरम्यान, आंदोलनात पोलिसांनी दंडुकेशाही केल्याचा आरोप राम नेवले यांनी यावेळी केला. ज्योती खांडेकर यांना उचलून गाडीत कोंबत असताना डोक्याला मार लागला, पोलिसांनी महिला आंदोलकांच्या अस्ताव्यस्त कपड्यांचाही विचार केला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रस्ता मोकळा झाला परंतु, पुन्हा अन्य कार्यकर्त्यांनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले. कार्यकर्त्यांना अटक करून टाकळी पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. भादंविच्या कलम १८८, २६९, ३४१, ३५ कलमानुसार कारवाई करून सायंकाळी सुटका केली.

Leave a Reply