सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

धारोष्ण दुध

“धारोष्ण” दुध पिण्याचे फायदे सांगताना आताची म्हातारी मंडळी थकता थकत नाही. आज कालच्या पिढीच्या जगण्याचे तारतम्य बघितले की म्हाता-या पिढीचा जीव कासावीस होतो. ह्या असल्या जीवनप्रणाली ची कल्पना त्यांना असह्य होते. असे म्हणतात आपल्याला पहिल्या ५-१० वर्षात बाळकडू पाजले जाते, त्याचा परिणाम तुमच्या जीवनभर राहात असतो. आजची पिढी आधीच घरघुशी, सदैव कॉम्पुटर नाही तर मोबाइल स्क्रीन वर डोळे फाडफाडून डोळ्याचा खाचा करून, लहानपणापासून मोठमोठाल्या भिंगाचा चष्मा घालून, मिचक्या डोळ्यांनी जगणारी झाली आहे. हे सगळे आपल्या संस्कृतीच्या विपरीत सगळे चालले आहे. आमच्या शास्त्रात, श्लोकात “आरोग्यम् धनसंपदा” म्हटले आहे आणि ही पिढी नेमकी ही धनसंपदा वयानुपरत्वे लवकर पणाला लावीत आहे. ह्याचे जुन्या पिढीला फार वाईट वाटत आहे.
पाश्चात्य विज्ञानाने आमच्या शरीराला पहिले लॅपटॉप नंतर मोबाईल फोन सारख्या accessories दिल्या आहेत. ज्या तुम्ही कुठे ही फिरायला जा, सतत तुम्हाला चिटकल्या असतात. इतक्या की विमानसेवेत ग्राहकसेवेचा भाग म्हणून लॅपटॉप बॅग चे वजन, मोफत केले आहे, केबिन लगेज मधून. धन कमविण्यासाठी आपण जरी हे सर्व कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल जरी उपयोगी असल्या तरी “आरोग्यम् धनसंपदा” ह्या आमच्या पिढीजात परंपरेला आव्हान आहे. आरोग्याला हानिकारक आहे.
पंजाब, हरियाणा प्रचंड दुधदुभत्याचा प्रदेश आणि खेळाडुंना जगाच्या अग्र स्थानावर आणणारे राज्य. येथील खेळाडू दुध दुभत्याचा, शारीरिक संगोपनासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेते पद मिळण्यामध्ये “दुधाचा सहभाग” सर्वांसमक्ष मान्य करीत असतात.
आम्हाला शाळेत शिकविले होते की न्युझीलंड च्या गायी खुप दुध देतात. एक एक गाय ६० -७० लिटर दूध देते. व्यापारिक दृष्टीने आम्हाला बालपणात, आमच्या मनात बिंबवले गेले की पाश्चात्त्य गायी भरपूर दूध देतात. न्यूझीलंड च्या गायींचे गुणगान शिकविले. आणि भारतीय गाईंबद्दल मात्र काही एक शब्द शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहील्या गेला नाही. फक्त भगवान श्रीकृष्णाचा विषय आला की दुध, दही, लोण्याचा संदर्भ यायचा बाकी आमचे शिक्षणखाते सदैव पाश्चात्य विज्ञानाचे अनुकरण करण्यात लीन व भारतीय संस्कृती, परंपरा कशा वाईट? भारतीय चालीरीती कशा घातक? हे लोकांच्या मनात बिंबवण्यात व्यस्त. आपली मानसिकता पाश्चात्य अनुकरणाने पार ढासळलेली आहे आणि आज ही आम्ही ह्या मानसिक गुलामी मध्ये खितपत पडलो आहोत.
अशा गुलामगिरीत खितपत पडलेल्या व्यापारिक मानसिकतेतून भारतातील गायींना जर्सी, होलेस्टन-फ्रिजीयन, ब्राउन स्वीस जातींना संकरित करुन आम्ही भारतीय जातीच्या साहीवाल, गिर, रेड, सिंधी ह्या दुधाळ श्रेणीत वर्गीकृत असणा-या गायींची उपयुक्तता फक्त व्यवसायासाठी दुधाजोगी करून ठेवली आहे. असल्या गाईंच्या दुधाच्या मुलभूत गुणांची नासवून ठेवली आहे.
कालांतराने पाश्चात्य मंडळीना न्युझीलंड “जर्सी” गायीच्या दुध पिणारी मंडळी दीर्घ आजाराचे बळी पडु लागली आणि ह्यावरील संशोधनाचा एक निष्कर्ष असा देण्यात आला की पाश्चात्त्य गायींमध्ये ए-१ प्रथिने असतात. ही प्रथिने शरीराला त्रासदायक ठरतात. दीर्घ कालीन सेवनाने ऑटोइम्युन – स्वप्रतिकारक आजार, अतिरक्तदाब, कॅन्सर सारख्या रोगांना चालना मिळते. असा एक कयास व्यक्त केला गेला.
भारतातील गायी, आफ्रिकेतील गायींमध्ये असलेली प्रथिने ए-२ प्रकारची आहेत. व ह्या सर्व वरील दुष्परिणामातून मुक्त आहेत. विना संकरित भारतीय गायींचे महत्व ब्राझील देशाला कळले, आज ब्राझील देशात ८०% गायी मुलरूप भारतीय गायी आहेत. आमचे जगज्जेत्ते भारतीय खेळाडू पंजाब-हरियाणातील ह्या गायींच्या दुधाचे गुणगान करीत असतात कारण मुळ भारतीय वंशाच्या गाईंमध्ये शरीराला दुष्परिणाम रहित, पोषक तत्वे आहेत. “बेटा, दुध पियो, ताकद मिलेगी” असे प्रत्येक बालगोपालांची आपल्या लेकरांना मनवीत असते. “छोटी गौए – छोटे छोटे ग्वाल – छोट्टेसो मेरे मदनगोपाल” आमच्या देवांनाही गाईंबद्दल प्रेम ! कारण ए-२ दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फेट, क्लोराईड इत्यादी ०.७-०.९% आढळतात तर बोरॉन, लोह, तांबे, मॅंग्नीज, गंधक, तांबे ही खनिज त्याहुन कमी प्रमाणात आढळतात. अधिक अ, ड, ई, के ही जीवनसत्त्वे घृतांशात विरघळलेल्या स्वरूपात तर बी-१, बी-२, सी, फोलिक ऍसिड ही जीवनसत्त्वे पाण्याच्या द्रव्य रुपात आढळतात. जी स्वस्थ आरोग्यासाठी अविभाज्य उपयोगी आहेत.
ह्यात मात्र धारोष्ण दुधाची महत्ता अगणित आहे.
भारतात व्यायाम करणारे बरेच लोक शक्यतो धारोष्ण दूध पितात. कोल्हापूरमध्ये अजून धारोष्ण दूध रस्तोरस्ती मिळते व त्याचा आणि पहिलवानकीचा संबंध त्याद्वारे स्पष्ट होईल. आमचे भारतीय खेळाडू देखील बघा. “धारोष्ण” दुधाचे कायल. मात्र दूध आणल्यानंतर ते दिवसातून २-३ वेळा उकळतात, नासु नये म्हणून. दुधात कधीमधी काही वेगळे जंतू-जिवाणू असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उकळल्याने ते नष्ट होतात ही आमची धारणा व असे दूध प्यायल्यानंतर बाधा होत नाही असे सर्वसाधारण समज आहे. मात्र, उकळल्यानंतर दुधातली नैसर्गिक लॅक्टोज जिवाणू आणि काही हॉर्मोन्स नष्ट होतात व केवळ प्रथिने, फॅट आणि लॅक्टोज साखर तसेच काही क्षार उरतात त्यामुळे उकळलेले दूध हे पोषणदृष्ट्या काही अंशी निरुपयोगी झालेले असते. यातली साकळलेली प्रथिने पचायला जड होतात. उकळलेले दूध काही तास बाहेरच्या तपमानात ठेवले तर ते नासते व त्यातून दुर्गंध येतो याचे कारण वातावरणातले काही जंतू त्यावर कब्जा करून प्रथिनांचे व साखरेचे विघटन घडवून आणतात. उकळलेल्या दुधापेक्षा मूळ निरसे, धारोष्ण दूध हे जास्त पोषक व आरोग्यकारक असते.
२०२० सालच्या गणनेनुसार भारतात सगळ्यात जास्त म्हणजे ३३.३७% जागतिक आकडेवारीनुसार गाई म्हशींच्या संख्येत आघाडीवर पहिल्या नंबरवर आहे. भारतीय मुल च्या गाई दुध कमी देतात ही रास्त ओरड आहे. कारण Quality is adversely proportionate to Quantity. हे सुत्र इथे बरोबर तंतोतंत बसते.
दुर्दैवाने आफ्रिकेत लोकांना गाईच्या दुधाचे महत्व नाही. माझा आफ्रिकन मित्र डॉ. उहदे ह्याच्याशी गप्पा मारताना विषय निघाला, गाईच्या दुधाचा तर त्याला आश्चर्य वाटले की भारतीय लोकं गाईच्या शरीराच्या आतले दुध काढून कसे पिऊ शकतात? मात्र ही ख्रिश्चन मंडळी गाईचे मांस मोठ्या आवडीने खातात. सकाळी आठ वाजता चे सुमारास उघड्या पिक अप व्हॅन मधुन उघड्यावरच् कत्तलखान्यातून गाईचे कापलेले मांस सर्रास पणे विक्री केंद्रावर पाठविले जाते. शहराबाहेरील कबिल्यात ५०-६० गाईंचा झुंड फक्त गाई कापण्यासाठी पाळला जातो. आज ही दुध हे पाश्चात्य देशातून पाश्चाराईज्ड टिकेल, अशा दृष्टीने आयात केले जाते. लहान आफ्रिकन मुलांचा समज असा की दूध कारखान्यात बनते. हे ऐकून तर माझ्यासारख्या भारतीयाला अहो-आश्चर्य वाटले.
मी न्यु-बुसा (नाईजेरियाला) येत असताना गाईंचा कळप पाहिला. म्हटले चला गाईच्या ताज्या (धारोष्ण) दुधाची सोय झाली. गेटवर सिक्युरिटी ला विचारले. त्याला हे अतिशय किळसवाणे वाटले की गाईच्या आतील दुध कसे काय पिऊ शकता? मी २ लिटरची छोटी प्लास्टिक ची बादली, चाडी आणि एक लिटरच्या चार रिकाम्या पाण्याच्या झाकणासहीत बाटल्या घेतल्या. म्हटले चल गाईच्या कळपाच्या मालकाकडे. साधारण गावाबाहेर बारा किलोमीटर दूर. झाडीयुक्त छोटेसे जंगल, मियाच्या ५-६ बायका त्याचे १५-१८ पोरं आणि एक छोटीशी झोपडी. आजुबाजुला ५० एक गाई, कोणी रवंथ करीत तर कोणी चरताहेत. असा मियाचा जंगली संसार.
मियांला दूध विचारले तर पहिले तर तो मोठ्याने हासला. दुभाष्या ने सांगितले तो म्हणतोय ते दुध बछड्यासाठी असतं, आपल्यासाठी नसतं. मी प्रात्यक्षिक करून दुध कसं काढायचं हे सांगितलं. दिवसाआड एक लिटर दे आणि पैसे ठरवले तर मियाला हासु फुटले. पिवळ्या दाताच्या मियाने मोठे स्मित केले म्हणाला मी तर रोज देऊ शकतो दुध घरपोच.
गॉम्बे अडामावा स्टेट – तिथे विचारले तर त्यांनी सांगितले की रोज जिथे बाजार भरतो, तिथे तुम्हाला दुध मिळेल.
मी बाजारात गेलो तर त्यांना दुधाचे उपयोग माहिती नाही. वाळक्या भोपळ्याचे भांडे करून त्यात दूध भरून ठेवतात. ते दुध नासते. आणि ते नासलेले दुध बाजारात विक्रीसाठी आणतात. गंमत म्हणजे नासलेले दुध पिणारा वर्ग ते दुध नियमित विकत घेत असतो. मी तर बुवा, पळ काढला त्या गॉंबेच्या बाजारातून.
सांगायचे तात्पर्य आम्ही भारतीय आमच्या मुलभूत चालीरीती ना कमी लेखत, पाश्चात्य अनुकरणाने आमच्या जीवन शैलीचा बट्ट्याबोळ करीत आहोत. आमची संस्कृती, चालीरीती ह्या साधुसंतांच्या दिव्य ज्ञानाने वसुधैव कुटुंबकम् च्या स्तरावरील सर्व पृथ्वीसाठी, सर्व प्राणी मात्रा साठी उपयुक्त आहे. मात्र हिंदू संस्कृती ला नेस्तनाबूत करण्यासाठी विडा उचलणा-या राजकारण्यांनी, व्यापारांनी आपापल्या नफ्यासाठी आमच्या संस्कृती चा -हास करण्यावर भर दिला.
आमच्या चालीरीती, आहार विषयक ज्ञान हे सगळे उज्वल, सुसंस्कारित, निरोगी जीवनशैलीचे द्योतक आहे. आम्ही मात्र पाश्चात्य पिझ्झा संस्कृती ला आवतन देवून, Allopathy विदेशी औषधांचा खप वाढवीत. निरोगी भारताचा रोगीट भारत करण्यात व्यस्त आहोत. स्वतः च्या तब्येतीचे बारा वाजवीत आहोत.
अशा परिस्थितीत भारत सरकारने मुल भारतीय गाईंचे संगोपन, जोपासना आणि संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. केले नसल्यास आवश्यक ते पेटंट करून मोठमोठ्या गौशाला प्रत्येक गावागावाबाहेर वेशीवर अशी केंद्रे वाढावी, ह्याची उपाययोजना करणे आवश्यक आहे. “धारोष्ण दुध” आजच्या पिढीला मिळेल ह्याची सर्वकष शहानिशा करून – भारतीय निरोगी, स्वस्थ पिढी तयार करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. करिता हा सर्व लेखनाचा उपद्व्याप. “धारोष्ण दुधाचे” पेटंट करणे आवश्यक आहे.
अन्यथा नायजेरियन बालकाच्या कल्पना विस्ताराप्रमाणे बटाट्यापासून फॅक्टरी मध्ये दुध बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वीडन ची कंपनी डेयरी फर्म “डग” ने दावा केला आहे की त्यांनी बटाट्यापासून दूध बनविले आहे. ज्यात भरपूर व्हिटॅमिन डी बी-१२, फॉलिक ऍसिड, मिनरल, फायबर, कार्बोहायड्रेट्स आहेत.
भारत सरकारने अशा उत्पादनांना भारतात परवानगी देवू नये अन्यथा काळाच्या ओघात व व्यापारी नफ्यात, आमच्या गाई आणि “धारोष्ण दुध” संस्कृती पडद्याआड होण्याची, नष्ट होण्याची दाट शक्यता नाकारता येण्याजोगी नाही.

भाई देवघरे

Leave a Reply