कोरोना संक्रमण काळात भारतीय रेल्वेचे ३६,००० कोटी रुपयांचं नुकसान – रावसाहेब दानवे यांचा दावा

नवी दिल्ली : २४ ऑगस्ट – भारतीय रेल्वे प्रशासनाला कोविड १९ संक्रमण काळात जवळपास ३६,००० कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी हा दावा केलाय.
महाराष्ट्रातील जालना रेल्वे स्टेशनवर एका अंडरब्रिजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना दानवे संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी करोना काळात रेल्वेला ३६ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी मार्च महिन्यात (मार्च २०२१) करोना संक्रमण फैलावत असल्याची जाणीव झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारनं देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. याचवेळी रेल्वेचं संचालनही संपूर्णत: ठप्प झालं होतं.
लॉकडाऊनसारख्या कठिण काळात रेल्वेच्या मालगाड्यांचं संचालन अत्यावश्यक सेवा-सुविधांचं वाहतूक करण्यासाठी सुरू ठेवण्यात आलं होतं. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही भारतीय रेल्वेच्या सर्व रेल्वेंचं संचालन अद्यापही पूर्णत: सुरळीतपणे सुरू होऊ शकलेलं नाही.
पॅसेंजर रेल्वे नेहमीच तोट्यात चालतात. तिकीटांचे दर वाढवल्याचा दबाव प्रवाशांच्या खिशावर पडतो. त्यामुळे तिकीट दर वाढवता येत नाहीत. करोना संक्रमणकाळात रेल्वे प्रशासनाला ३६ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. सध्या केवळ मालगाड्यांद्वारे महसूल उत्पन्न होतंय असं सांगतानाच रेल्वेच्या या मालगाड्यांनी करोना काळात मालाची वाहतूक करण्यात आणि नागरिकांना दिलासा देण्यात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली, असं म्हणत दानवे यांनी रेल्वे प्रशासनाचं कौतुकही केलं.

Leave a Reply