मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य – रावसाहेब दानवे

जालना : २३ ऑगस्ट – जालना आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य राहील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. या मार्गाच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर एकदा अहवालाचे सादरीकरण झालेले आहे. परंतु या प्राथमिक सादरीकरणात कांही दुरुस्त्या सुचविण्यात आल्याने आता येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दुसरे सादरीकरण होणार असल्याचे दानवे म्हणाले.
जालना रेल्वेस्थानकाजवळ तयार करण्यात येणाऱ्या ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटय़ाल, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, नगराध्यक्षा संगीता गोरंटय़ाल यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.
या वेळी दानवे म्हणाले, बुलेट ट्रेनमुळे मुंबईपासून औरंगाबादचा प्रवास दीड तासात होईल. तर जालन्यापर्यंतचा प्रवास पाऊणे दोन तासात होईल. अशा प्रकारचे सात मोठे प्रकल्प देशात होणार असून त्यामध्ये आठवा प्रकल्प म्हणून या मार्गाचा समावेश करणार आहे. फक्त रेल्वे वाहतुकीसाठी दिल्ली ते मुंबईतील जेएनपीटी दरम्यान मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग टाकण्यात येणार असून हा प्रकल्प ५० हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. पूवरेत्तर राज्यांसाठी असाच एक स्वतंत्र मार्ग करण्यात येणार आहे. रेल्वेच्या मालवाहतुकीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. क्रॉसिंगसाठी मालगाडय़ांना थांबावे लागते आणि त्यांच्या गतीवर परिणाम होतो. रेल्वेस प्रवासी वाहतुकीत तोटा होतो.
प्रवासी वाहतुकीसाठी एक रुपयांच्या तिकिटामागे ४८ पैसे तोटा केंद्र सरकारला सहन करावा लागतो. करोनाकाळात प्रवासी वाहतुकीमुळे केंद्रास ३६ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले. जालना-खामगाव या नवीन रेल्वे मार्गाचे प्रस्ताव आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसल्यामुळे तीन वेळेस नामंजूर झाले आहेत. आता पुन्हा यासंदर्भात प्रस्ताव मागविला अ्सल्याचे दानवे यांनी सांगितले. पालकमंत्री राजेश टोपे आणि आमदार कैलास गोरंटय़ाल यांचीही भाषणे या वेळी झाली.
दानवे यांच्याकडून जालना-खामगाव आणि सोलापूर-जळगाव या नवीन रेल्वेमार्गाबाबत अपेक्षा व्यक्त करून राजेश टोपे म्हणाले,की कामाचे प्राधान्यक्रम ते ठरवतील. जालना शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेणारच आहोत. जिल्ह्य़ात १०४ कोटी रुपये खर्चाचे मानसोपचार रुग्णालय सुरू होणार आहे. जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात पीपीपी किंवा शासकीय खर्चातून उभारणी यापैकी एक मॉडेल ठरावयाचे आहे.

Leave a Reply