बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

गोंदिया : २३ ऑगस्ट – पाळीव जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. देवराम तुळशीराम गहाणे (४२) रा. कोसबी असे जखमीचे नाव आहे. वन परिक्षेत्रअधिकारी कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या बकी कोसबी जवळजवज नवेगाव – नागझिरा अभयारण्य आहे.
वनातील वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात कोसबी, कोलारगाव, बकी , मेंडकी, कोसमघाट परिसरात नेहमीच त्यांचा वावर दिसून येतो. रोजच्या प्रमाणे देवराम हे आज सकाळी त्यांच्या जनावरांकरिता चारा आणण्याकरिता जंगल शिवाराला लागून असलेल्या शेतात गेले दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले सर्वप्रथम त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रथमोपचारानंतर देवराम गहाणे यांना गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पंचभाई, वन्यजीव विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार , सहवनक्षेत्र अधिकारी नरेंद्र वाढई, वनरक्षक आनंद बनसोड आदी वनकर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. गावकऱ्यांशी चर्चा करून वन विभागाकडून योग्य ती आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply