काबुल विमानतळावरून १५० नागरिकांचे तालिबान्यांनी केले अपहरण, भारतीयांचाही समावेश

नवी दिल्ली : २१ ऑगस्ट – अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. सर्वच देशांनी आपापल्या देशवासीयांना वाचवण्यासाठीची खटपट सुरु केली असून अनेक अफगाण नागरिकांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचं सत्र सुरू केलं. या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बातमी समोर येत आहे. ती म्हणजे साधारण १५० नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे.
काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालय याविषयी अधिक माहिती घेत असून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे. दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५० भारतीयांचं अपहरण केलेलं नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply