खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द

मुंबई : १९ ऑगस्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खराब हवामानामुळे पालघरला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाले.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, हसन मुश्नीफ, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, दादा भुसे हे मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं नियोजन आहे. मात्र आता खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन हजर राहतील.
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अखेर मुख्यालयाच्या उद्घाटनाला आजचा मुहूर्त मिळाला.१९ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयाचं उद्घाटन होत आहे. जिल्हा मुख्यालयाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इतर दोन अशी पाच कार्यालये एकाच प्रांगणात आहेत.

Leave a Reply