अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांना भारताने राहण्यासाठी पाचारण करावे – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : १९ ऑगस्ट – आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, त्यांनी अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना अफगाणिस्तानातून परागंदा झालेल्या राष्ट्रपती अशरफ गनी यांना भारतानं राहण्यासाठी पाचरण करावं, असा अनाहूत सल्ला दिलाय.
गनी हे तुलनेत उच्चशिक्षित आहेत (मुख्यतः यूएस मध्ये) पाकव्याप्त काश्मीरमध्ये अमेरिकेच्या आधुनिक हत्यारांसह तालिबानकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जाईल, त्यावेळेस ते भारताला मदत करू शकतील, असंही स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
भाजपशी अंतर्गत वादाला सामोरे जात असलेल्या राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत – अफगाणिस्तान संबंधांवर भाष्य केलंय. दोन दिवसांपूर्वी तालिबान, पाकिस्तान आणि चीन मिळून भारतावर हल्ला करू शकतात, अशी शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली होती.
भविष्यात कोण चुकीचं किंवा कोण बरोबर, याचा अंदाज लावणं हे वेळ वाया घालवणं ठरेल. यासाठी दोन किंवा अधिक संभाव्य परिणामांसाठी तयार राहण्याची गरज आहे, असंही स्वामी यांनी यावेळी म्हटलं होतं.

Leave a Reply