नितीन गडकरी स्वपक्षीय नेत्यांना कामातील दिरंगाई प्रकरणी केव्हा जाब विचारतील – वंचित बहुजन आघाडी

अकोला : १८ ऑगस्ट – रस्त्यांच्या कामात आडकाठी आणल्याप्रकरणी शिवसेनेला गंर्भित इशारा देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वपक्षीय नेत्यांना रस्त्यांच्या कामातील दिरंगाई प्रकरणी केव्हा जाब विचारतील, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे.
वाशीम जिल्ह्यत रस्त्यांच्या कामात शिवसैनिक अडथळा निर्माण करत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरींनी शिवसेनेला आरसा दाखवून योग्यच केले. नितीन गडकरींनी स्वपक्षीय नेत्यांनाही जाब विचारण्याची गरज आहे. भाजपची सत्ता असलेल्या अकोला महानगरातील सर्वच रस्ते अपूर्ण आहेत. उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असून त्यावर ते चकार शब्द ही काढत नाहीत, हे दुर्दैवी आहे. अकोल्यात २० वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. ते गेले दोन वर्षे केंद्रीय मंत्री देखील होते. जिल्हय़ात पाच आमदार असून संपूर्ण पाच वर्षे पालकमंत्री भाजपचे होते. महापालिकेत पूर्ण बहुमताची सत्ता व महापौर आहेत. स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना मात्र नितीन गडकरी मोठय़ा मनाने माफ करतात, असा टोला डॉ. पुंडकर यांनी लगावून अकोलेकर आता भाजपला माफ करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अकोल्यातील अंतर्गत रस्ते आणि महामार्गावरील रस्ते व उड्डाणपूल अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. अकोला- अकोट, अकोला- वाडेगाव, अकोला- अमरावती महामार्गावर अनेक निष्पाप लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. तरीही ती कामे पूर्ण होत नाहीत. या कामाकडे भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केले. अकोल्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झालेली आहे. संबंधित रस्त्यांचे ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी संगनमताने मलाई खात आहेत, असा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला.
अकोल्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी तर बांधकाम विभाग वेठीस धरला आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी सुद्धा गडकरींनी पुढाकार घ्यावा. जिल्हय़ातील स्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कामांसंदर्भातही एक ‘लेटरबॉम्ब’ टाकावा, किमान त्यामुळे तरी अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण होऊन नरकयातनेतून अकोलेकरांची सुटका होईल, अशी अपेक्षा डॉ. पुंडकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply