७ लाख ६६ हजारांची चोरी करून पळून गेलेल्या तामिळनाडू गँगला बुलढाण्यातून अटक

नागपूर : १७ ऑगस्ट – नागपूर शहरात येऊन गाड्यांच्या काचा फोडून तेथून मुद्देमाल चोरणाऱ्या तामिळनाडू गँगला गुन्हे शाखेच्या पथकाने ७ लाख ६६ हजारांच्या मुद्देमालासह बुलडाणा जिल्ह्य़ातून चालत्या ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले आहे.
बाबा फरीदनगर येथे राहणारे दीनदयाल मंसाराम रहांगडाले हे चालक आहेत. त्यांनी १३ ऑगस्टला त्यांचे मालक आणि त्यांच्या मुलाला जनता चौकात सोडले. मालक आणि त्यांचा मुलगा त्यांच्या कामासाठी निघून गेले. दीनदयाल त्यावेळी गाडीत बसले होते. काही वेळांनी मालक आले. त्यांना गाडीत ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यांनी चालकाला याबाबत विचारले असता दीनदयाल यांनी सांगितले की, एक इसम त्यांच्याकडे आला. त्याने पैसे खाली पडलेले असल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी दीनदयाल गाडीच्या बाहेर गेले. तेवढय़ात दुसर्याने गाडीच्या दुसर्या बाजूने येऊन गाडीत ठेवलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी दीनदयाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात लागलेले सी.ओ.सी.चे सीसी टीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक पद्धतीचा आणि गोपनीय यंत्रणेचा वापर करून गुन्ह्य़ाचा छडा लावला. आरोपी शहरात गुन्हा करून औरंगाबादकरिता महाराष्ट्र ट्रॅव्हल्स क्र. एमएच0३ सी.पी. १९0१ मध्ये बसून १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघाले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस पथकाने त्या ट्रॅव्हल्सबाबत सविस्तर माहिती काढून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मयुर चौरसिया आणि त्यांच्या पथकाने अतिदक्षता बाळगून आरोपींचा पाठलाग सुरू केला.
मुत्तुकुमार सुखनिगम (४१) रा. गांधीबाग त्रिची, गुणा थनिकाचलम (२४), व्यंकटेश सोरेन रवींद्र सोरेन (३२), थिलक कंथासामी (३५), कीर्ती दुराई (४५), भास्कर कथीरवेल शेरवई (५१), गोपीनाथ दुरई सामी (५२) सर्व रा. त्रिची तामिळनाडू, असे ताब्यातील आरोपींचे नाव आहे.

Leave a Reply