सराफा व्यापाऱ्याचे ७५ लाखांचे दागिने असलेल्या दोन बॅग घेऊन दुचाकीस्वार पसार

भंडारा : १७ ऑगस्ट – सराफा दुकान उघडण्यासाठी मोपेडने आलेल्या सराफा व्यावसायीकाचे सोनेचांदीचे दागिने असलेले दोन बॅग अज्ञात दुचाकीस्वारांनी पळवूून नेल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप ठाणा टी-पॉईंटवर सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. या बॅगमध्ये सुमारे ७५ लाखांचे सोनेचांदीचे दागिने असल्याचे सराफा व्यापाऱ्याने सांगितले. चोरांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पेट्रोलपंप ठाणा येथील विनोद भुजाडे यांचे स्वाती ज्वेलर्स नावाने बसस्टॅंडच्या मागे सराफा दुकान आहे. दुकानापासून त्यांचे घर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. सकाळी १0.३0 वाजता ते मोपेडने दोन बॅगमध्ये दागिने घेऊन निघाले. एका बॅगमध्ये सोन्याचे आणि दुसऱ्या बॅगमध्ये चांदीचे दागिने होते. दुकानासमोर आल्यानंतर त्यांनी मोपेड लावली. व खाली उतरून दुकान उघडण्यासाठी पुढे गेले. तेवढय़ात रेसिंग बाईकने आलेल्या दोन चोरट्यांनी दागिण्यांची दोन्ही बॅग घेऊन धूम स्टाईल पळ काढला. ही बाब लक्षात येताच भुजाडे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. कोब्रा बटालियनच्या एका जवानानेही त्यांचा पाठलाग केला. परंतु, भरधाव वेगात चोरटे नागपूरच्या दिशेने पसार झाले. चोरट्यांचा माथनी टोलनाक्यापर्यंत शोध घेण्यात आला. परंतु, ते सापडले नाहीत.
या घटनेनंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. जवाहरनगर पोलिस तातडीने पेट्रोलपंप ठाणा येथे पोहोचले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.
या दोन्ही बॅगमध्ये ७५ लाखांचे दागिने असल्याचे सराफा व्यापारी विनोद भुजाडे यांनी सांगितले. आपली ३0 वर्षांची कमाई चोरांनी पळवून नेल्याचेही ते म्हणाले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply