यवतमाळात धार्मिक कार्यक्रमाच्या महाप्रसादातून ४५ जणांना विषबाधा

यवतमाळ: १७ ऑगस्ट – यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादातून ४५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजी नाईक येथे धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला नातेवाईकांसह शेजारील नागरिकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. तसंच कार्यक्रमामध्ये जेवनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री ८ च्या दरम्यान जवळ पास ४५ जणांनी या कार्यक्रमात जेवणकरुन आप आपल्या घरी निघून गेले.
पण, दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्टला सकाळी ४ च्या दरम्यान जी लोक जेवून गेली होती त्यांच्या पोटात दुखणे, संडास व उलट्या सुरू झाल्या. गावातील नागरिकांनी सर्वांना भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.
परंतु, काहींची तब्येत खालावत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता आर्णी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेला व मुलाला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तीवर भांबोरा येथील वैद्यकीय अधिकारी पवार, आर्णी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल भवरे व नितिन लकडे यांनी तत्काळ उपचार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. विषबाधा झालेल्यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Leave a Reply