बैलगाडा शर्यतींबद्दल राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी – गोपीचंद पडळकर

पुणे : १७ ऑगस्ट – राष्ट्रवादीची बैलगाडा शर्यतीबद्दलची दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका आता शेतकऱ्यांसमोर उघडी पडत आहे, असं म्हणत आता भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख आणि महाराष्ट्राची शान असलेल्या बैलगाडा छकडा शर्यती नामशेष करण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये पडळकर म्हणतात, “महाराष्ट्राची शान आणि भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचं कपटाने नामोनिशाण मिटवण्यासाठी हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत. यांना मागील दोन वर्षांपासून ना तारीख काढता आली, ना अध्यादेश काढता आला. जेव्हा मी स्पर्धेचं आयोजन केलं, तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन असं भासवलं की आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही.”
बैलगाडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी केल्यावरुनही त्यांनी राष्ट्रवादीविरोधात टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या अखत्यारित असलेल्या गृहखात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहेत. आज १७ तारखेपासूनच सगळीकडे नाकाबंदी करण्याचे आदेश त्यांनी काढलेले आहेत. अरे, इथे बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानवरून तालिबानी तर येणार नाहीत. इतका बंदोबस्त लावून तुम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहात.”
ते पुढे म्हणतात, “मुळात आम्हाला या सगळ्यात राजकारण आणायचं नाही. कारण बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. आणि म्हणून तुमची दुटप्पी-दुतोंडी भूमिका आता शेतकऱ्यांसमोर उघडी पडत आहे. या बैलगाडा शर्यतीला तुमचं जर पाठबळ असेल तर तुम्ही सर्वजण या विषयामध्ये मदत करा. शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही ताकतीने या विषयामध्ये उतरा. आपण जर ताकदीने उतरलो तरच आपला बैल वाचेल, आपला गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडा शर्यती चालू होतील.”

Leave a Reply