चंद्रकांत पाटील जितकं तुमचं वय, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकिर्द – रुपालीताई चाकणकर

मुंबई : १७ ऑगस्ट – ‘चंद्रकांत पाटील तुमचं जितकं वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकिर्द आहे, त्यामुळे कोल्हापूर व्हाया कोथरूड आमदार झालेले पाटील यांनी हे लक्षात ठेवावं’, असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबद्दल आठवण करून देत टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनीही पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता आणि पवारांचं वय काढलं होतं. त्यावर आज रुपाली चाकणकर यांनी जशास तसे उत्तर दिले.
‘गेल्या 8 महिन्यांपासून 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे प्रलंबित आहे. ही का रखडली आहे, हे अवघा महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यादी राज्यपालांकडे पाठवत असतो. त्यानंतर राज्यपाल राजशिष्टाचार पाळत ती नावं मान्य करतात.
पण, राज्यपाल यांचं प्रेम किती आहे, हे आपण जवळून पाहत आहोत. राज्यात भाजपची सत्ता नाही. त्यामुळे होईल त्या मार्गाने सरकारची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे’ अशी टीका चाकणकर यांनी केली.
‘चंद्रकांत पाटील तुमचं जितकं वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकिर्द आहे, त्यामुळे कोल्हापूर व्हाया कोथरूड आमदार झालेले पाटील यांनी हे लक्षात ठेवावं’ असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी पाटील यांना लगावला.
तसंच, शरद पवार यांनी राज्यपालांना या यादीबद्दल आठवण करून दिली. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांच्या मदतीला धावून जात पवारांवर टीका केली होती. पण राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाही, त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू मांडायची. आपण चार दिवस दिल्लीत थांबला होता. पण, तरीही अमित शहा यांनी तुम्हाला भेट दिली नाही. याचं आत्मचिंतन करावं, त्यामुळे कुणाच्या वयाचा काय मुद्दा आहे, कुणावर काय बोलावं, याचं भान तुम्हाला येईल’ असा टोलाही चाकणकर यांनी लगावला.
पवारांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली. खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली. ‘राज्यपालांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांना विसर पडला असेल, असं पवार म्हणाले आहे. मग राज्यपालांचे वय झालं आहे, तर पवारांचे वय झाले नाही का? कशाला वयाचा मुद्दा काढता, असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

Leave a Reply