अफगाणिस्तानमधील अराजकतेला जो बायडेन जबाबदार त्यांनी राजीनामा द्यावा – डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : १६ ऑगस्ट – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जबाबदार धरले असून जो बायडेन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सरकार कोसळलं असून तालिबानने कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आणि उपरराष्ट्रपती देश सोडून निघून गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जारी केलेल्या निवेदनात बायडेन यांच्यावर निशाणा साधलाय. अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जबाबदार धरत जो बायडेन यांनी राजीनामा द्यायची वेळ आली आहे, असं त्यांनी म्हटलंय.
रविवारी अफगाणिस्तान सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर लगेच ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिलीए. “बायडेन यांनी अफगाणिस्तानमध्ये जे होऊ दिलं, त्यासह देशातील करोना रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. सीमेवर भयानक परिस्थिती असून सगळं उद्ध्वस्त झालंय. तर, देशातील अर्थव्यवस्थाही बायडेन यांनी अपंग करून सोडली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा देऊन द्यायला पाहिजे. जो बायडेन यांनी राजीनामा देणं ही गोष्ट फार मोठी समजायचं कारण नाही. असंही ते देशातल्या पहिल्या स्थानासाठी निवडून आलेले नाहीत.”असं ट्रम्प म्हणाले.
तालिबानने राजधानी काबुलसह राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील अराजकतेबद्दल जो बायडेन यांनी काय बोलायला हवं, याबद्दल व्हाईट हाऊसचे सल्लागार चर्चा करत आहेत. तसेच बायडेन यांनी त्यांची सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसला यायला हवं की नाही, याबद्दलही अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
रविवारी व्हाईट हाऊसच्या बाहेर प्रदर्शनं करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी जो बायडेन यांच्यावर युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील निष्पाप लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. तसेच पाकिस्तानवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली होती. पाकिस्तानच्या मदतीशिवाय तालिबान इतक्या लवकर काबुलवर कब्जा मिळवू शकत नाही, त्यामुळे पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यात यावी, असं बायडेन यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांना वाटतंय. त्यामुळे येत्या काळात जो बायडेन यांची अफगाणिस्तानबद्दलची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Leave a Reply