शिकारीच्या नादात कुत्रा आणि बिबट्या एकाच विहिरीत पडले

अमरावती : १४ ऑगस्ट – मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याच्या बातम्या हल्ली बऱ्याचदा समोर येत असतात. अमरावती शहराजवळ देखील बिबट्यांचा वावर वाढला आहे.बडनेरा-अंजणगाव मार्गावर असणाऱ्या एका शेतात कुत्र्याचा शिकारीसाठी पाठलाग करताना एक बिबट्या आढळून आला. दरम्यान यावेळी शुक्रवारी रात्री बिबट्या आणि श्वान दोघंही शेतात असणाऱ्या विहिरीत कोसळले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या अंबाडकर यांच्या शेतात ही घटना घडली आहे.
दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या आणि कुत्रा दोघंही या विहिरीत जिवंत आहेत. या विहिरीत पाणी असल्याने दोघंही आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघंजण आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहे. देवेश अंबाळकर हा युवक जेव्हा सकाळी शेतात गेला त्यावेळी त्याला आपल्या शेतातील विहिरीत बिबट्या आणि श्वान दोघे जिवंत असल्याचे दिसून आले.
बिबट्या आणि श्वान दोघेही वाचण्यासाठी आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहेत. विहिरीत असलेल्या एका लाकडावर दोघेही बसले असल्याच दिसते. विहिरीत सध्या २० फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असून वन विभागाची टीम आणि गावकरी या दोघांनाही काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. सुरुवातीला वनविभागाचे अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. मात्र आता गावकरी आणि वनविभागाची टीम दोघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply