घरगुती वादातून दोन गटात तुफान मारामारी, तीन गंभीर तर १० किरकोळ जखमी

अकोला : १४ ऑगस्ट – घरगुती वादातून झालेल्या मारामारीत तीन जण गंभीर जखमी झाले तर दहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सासर-माहेरच्या मंडळींमध्ये वादावर तोडगा काढताना खटके उडाले. त्यानंतर याचे पर्यावसान दोन गटांतील मारहाणीत झाले. अकोला जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
अमरावती येथील माहेर असलेल्या तरुणीचा विवाह अकोल्याच्या धोत्रा शिंदे येथील एका परिवारात काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र तेव्हापासूनच विवाहितेचा सासरच्या मंडळींसोबत वाद सुरु होता. याच प्रकरणी समजूत घालण्यासाठी अमरावतीवरुन काही मंडळी धोत्रा शिंदे येथे दाखल झाली होती.
समजूत काढताना वाद विकोपाला जाऊन याचे पर्यवसान दोन गटांतील मारहाणीत झाले. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम धोत्रा शिंदे येथे हा प्रकार घडला.
धोत्रा शिंदे येथील 45 वर्षीय शेख तालीफ शेख कुदरत, तर 25 वर्षीय शेख मुस्ताक शेख तानीफ आणि अमरावती येथील 18 वर्षीय साजीद खान मोहम्मद खान हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहेत. तर बाकी किरकोळ जखमींवर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात दोन्ही गटांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply