स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत विकास परिषद ७५ दीप प्रज्वलित करणार

नागपूर : १३ ऑगस्ट – १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याला ७४ वर्ष पूर्ण होत असून ७५वे वर्ष सुरु होत आहे. या निमित्ताने देशभर आनंदोत्सव साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी बरोबर रात्री १२ वाजता देशाला स्वातंत्र्य मिळाले होते याची आठवण ठेऊन भारत विकास परिषद या राष्ट्रीय संघटनेच्या विदर्भ प्रांतातील सर्व शाखा नागपुरातील शहीद स्मारकाजवळ एकत्र जमून मिरवणुकीने संविधान चौकात जाऊन आनंदोत्सव साजरा करणार आहेत.
या कार्यक्रमात भारत विकास परिषदेचे सर्व कार्यकर्ते गोवारी स्मारकाजवळील शहीद स्मारकाजवळ १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.३० वाजता एकत्र जमणार आहेत. तिथून तिरंग्यासह मिरवणुकीने पायी चालत संविधान चौकात पोहोचतील त्या ठिकाणी ठीक रात्री १२ वाजता ७५ दीप प्रज्वलित केले जातील आणि भारत माता पूजन केले जाईल. यावेळी निवृत्त कर्नल विपीन वैद्य आणि नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या परिसरात रांगोळ्यांनी सजावटही केली जाणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर भुशे, सीमा मुन्शी सचिव विदर्भ प्रांत पद्माकर धानोरकर महामंत्री प्रभृतींनी केले आहे.

Leave a Reply