बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले काम अतुलनिय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : १३ ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष संदेश दिला. यावेळी मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं काम हे अतुलनिय आहे असं सांगतानाच त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं नमूद केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत असल्याचं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही असंही मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. शिवाय भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच महाराजांबद्दल बाबासाहेबांना एवढी भक्ती आहे, असे गौरवोत्गार पंतप्रधानांनी काढले.
बाबासाहेब त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असतानाच आपला देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करतोय. बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशिर्वादच वाटत असणार यात शंका नाही. असंही मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहणार आहे, असंही मोदींनी बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलं. तरुण इतिहासकारांनी बाबासाहेबांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असंही मोदींनी सांगितलं. त्याचप्रमाणे इतिहासाबरोबरच बाबासाहेबांनी वर्तमानाचीही काळजी घेतली, गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षाच्या वेळेस त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना मी करतो, अशा शब्दांसहीत मोदींनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.
२०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, २०१५ मध्ये महाराष्ट्रभूषण पुसस्कार दिला. मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परमभक्ताला (बाबासाहेब पुरंदरेंना) कालीदास पुरस्कार देऊन गौरवलं होतं, अशी आठवणही मोदींनी यावेळी करुन दिली.

Leave a Reply