धर्मांतराच्या मुद्द्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची एकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

लखनऊ : १३ ऑगस्ट – उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका मुस्लीम व्यक्तीला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षकांचा जमाव मारहाण करताना दिसत आहे. जमावातील सर्वजण बजरंग दलाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तर मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद असे आहे. अहमद यांना त्यांच्या लहान मुलीसमोर टोळक्याने मारहाण केली. टोळक्याने त्यांना बळजबरीने ‘जय श्रीराम’च्या घोषणाही द्यायला लावल्या.
हा सर्व प्रकार सुरु असताना अहमद यांची लहान मुलगीही त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने बरीच गयावया केली. मात्र, वडिलांना बिलगून रडणाऱ्या या चिमुरडीची कोणालाही दया आली नाही. टोळक्याने मारहाण करुन झाल्यानंतर अहमद यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस आल्यानंतर अहमद यांना मारहाण सुरुच होती.
धर्मांतर करण्यासाठी एका दलित महिलेवर दबाव आणल्याच्या आरोपातून बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी अहमद यांना मारहाण केली. कानपूर येथील बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. गेल्या महिनाभरापासून या परिसरात तणावाचे वातावरण होते. अहमद आपल्या शेजारी राहणाऱ्या एका दलित महिलेवर बळजबरीनं धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता, असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply