सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

भंडारा : १२ ऑगस्ट – माहेरातून बायकोला घेण्यासाठी गेलेल्या विवाहित तरुणाने सासरच्या छळाला कंटाळून पवनी तालुक्यातील वाही जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे.
पुंडलिक सोनवाणे (५५), सुमन पुंडलिक सोनवाणे (५0), मंगेश पुंडलिक सोनवाणे (२४), मनीषा र्शावण बावणे (२८), रा. भिवापूर, विक्रम संपत शेंडे (६0) रा. हिरापूर जि.चंद्रपूर व मनोज शेंडे (४५) रा. कुही अशी आरोपींची नावे आहेत.
पवनी तालुक्यातील वाही येथील वैभव अशोक सतिबावणे याचे लग्न भिवापूर येथील कांचन नामक महिलेशी दोन वर्षापूर्वी झाले होते. वैभव कामासाठी कुटुंबासोबत दिघोरी, नागपूर येथे राहायचा. दरम्यान सासरकडील व्यक्तींचा त्याला मानसिक त्रास होत असल्याच्या तक्रारी वैभवने दिल्यामुळे त्याला आरोपींकडून धमकीचे फोन येत असत. २२ जुलैपासून त्याची पत्नी भिवापूर येथे माहेरी राहत होती. वैभवने वारंवार येण्याची विनंती करूनही आरोपी तिला पाठवीत नव्हते. त्यावेळीसुद्धा वैभवने तक्रार दिली होती. तेव्हापासून आरोपी मंगेश सोनवणे व मनोज शेंडे फोनवरून धमकी देत मानसिक त्रास देतांना पत्नीला वैभवपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरत होते. आरोपी विक्रम शेंडे याने ‘तू माझ्या भाचीला त्रास देतोस’ म्हणून वैभवला मारहाण देखील केली होती. सतत एक वर्षांपासून वैभवाला होणारा मानसिक त्रास असह्य झाल्याने आरोपींच्या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वाही जलशयाजवळील जंगल परिसरात झाडाला त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून भादंवि कलम ३0६, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजार करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु व ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिलांगे, पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत.

Leave a Reply