बँकेत बसणाऱ्या बँक मित्रांनीच केली खातेदारांची २ कोटीची फसवणूक

वर्धा : १२ ऑगस्ट – बँक मित्रांनी खातेदारांची फसणूक केल्याचे प्रकरण बाहेर येताच बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत तक्रारकर्त्या खातेदारांची रिघ लागली. फसवणुकीची रक्कम दोन कोटीच्या आसपास असल्याची चर्चा असुन सुमारे शंभरच्यावर खातेदार यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सचिन राऊत व दिनेश तायवाडे दोघांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे दोघेही गत दहावर्षापासुन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बँक मित्र म्हणुन काम करीत आहे. त्यांना आधी पाच हजार रुपये मानधन मिळत होते. त्यानंतर कमीशनवर त्यांचे काम सुरू झाले. ते सतत बँकेत राहत असल्यामुळे बँकेचे कर्मचारीच असल्याचा समज खातेदारांचा झाला.
फिक्स डिपॉझिट करुन देणे, खाते काढुन देणे, खात्यात रक्कम भरणे आदी कामे ते बँकेतच राहुन करीत होते. ज्यांना बँक व्यवहाराची माहिती नाही असे खातेदार अलगद त्यांच्या तावडीत सापडत गेले. बँकेत सीसी टिव्हीच्या कॅमेर्यात काम होत असल्यामुळे फसवणूक होईल अशी तिळ मात्र शंका खातेदारांना आली नाही. फिक्स डिपॉझीट करण्याकरिता, खात्यात जमा करण्याकरिता त्यांना खातेदार रक्कम देत गेले. हि रक्कम 50 हजारापासुन तर पाच लाखापर्यंतची होती. खातेदारांना या पोटी ते स्वत:च्या सही निशी काँऊटर स्लिप सुद्धा देत होते. त्यामुळे खातेदारला शंका घ्यायला वावच नव्हता. पाहता पाहता शंभराच्यावर खातेदार त्यांच्या जाळ्यात अडकत गेले तर सुमारे दोन कोटीच्यावर आकडा पोहचला.
खातेदारांनी दिलेली रक्कम सचीन राऊत व दिनेश तायवाडे स्वत: जवळ ठेवत होते. याची माहिती खातेदारास मिळाली की ते त्याची भलावणी करुन दुसरा सावज पाहत होते. त्याचे आलेले पैसे पहिल्याला देत होते. अशा टोप्या फिरवत फिरव पाच वर्ष कसे तरी निघाले. मात्र, आकडा व मागणार्यांची संख्या वाढत गेली आणि अखेर बिंग फुटले.
बँक मित्राने एका शेतकर्यापासुन पीक कर्ज खात्यात भरण्याकरिता 90 हजार रुपये घेतले होते. मात्र त्याने हि रक्कम खात्यात जमा केली नाही. परिणामी बँक मित्रासोबत संपर्क साधुन विचारणा केली असता त्याने चुक मान्य केली आणि धनादेश दिला. मात्र ज्या खात्याचा धनादेश दिला खात्यात रक्कमच नव्हती. शेतकर्याने प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्या सोबत संपर्क साधुन माहिती दिली. जगताप यांनी सरळ बँकेत जाऊन बँक मित्राला प्रसाद दिल्यानंतर गैरप्रकार उजेडात आला.
बँक मित्रांनी शेकडो खातेदारांची लाखो रुपयाने फसवणूक करुन त्यांना अडचणीत आणले आहे. अशा खातेदारांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा त्यांना कायदेशीर मदत केल्या जाईल असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव यांनी केले आहे. घटना येथे घडली असली तरी प्रकरणाचा तपास वर्धेच्या आर्थीक गुन्हे शाखा करणार असल्याने येथील पोलिसांनी खातेदारांच्या तक्रारी घेण्यास नकार दिला असुन त्यांना वर्धा येथे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला.

Leave a Reply