कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठीत करावी – उपसभापती निलम गोऱ्हे

नागपूर : १२ ऑगस्ट – कोरोनाचे संकट हे महायुध्दासारखे असून त्यामुळे या साथ रोगानंतर दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. जिल्हयात ७९५ महिलांचे कुंकू हिरावले आहे. तर १७५० बालकांचे मातृपितृ छत्र हरवले आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांना मदत करण्यासाठी जिल्हा टास्क फोर्स अतंर्गत उपसमिती गठीत करण्याचे निर्देश उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात कोरोनाकाळातील विविध विभागाच्या कामांचा त्यांनी आज आढावा घेतला. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जैस्वाल, आमदार मनिषा कांयदे, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर,महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलीस उपायुक्त संजय आव्हाड उपस्थित होते. कोरोनाकाळात शेतकरी, महिला, बालक, कामगार, आदीवासी वर्ग तसेच अन्य सर्व घटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आरोग्य, कृषी, आदीवासी, कामगार,महीला व बालकल्याण तसेच पोलीस यासह अन्य विभागाच्या मदत कार्याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. जिल्हयात चांगले काम झाले असून जिल्हयाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल हे सकारात्मक व आश्वासक चित्र असल्याचे श्रीमती गो-हे म्हणाल्या.
कोरोनाच्या आर्थिक अरिष्टातून सावरण्यासाठी व विकासप्रक्रीयेत सामावण्यासाठी सर्व मदत योजना नियमीतपणे राबविण्याची सूचना त्यांनी केली.या सर्वाचा अहवाल 12 सप्टेंबरपर्यत सादर करण्याचे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचित केले.
कोरोनाच्या या लढ्यात शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक सर्व एकजुटीने लढत आहे. जिल्ह्यातील 63 गावे सुरवातीपासून कोरोनामुक्त ठेवण्यास प्रशासनाला यश आले. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले उपक्रम राबविले असल्याची माहिती दिली.
बांधकाम कामगार मंडळाने १७ व १८ ऑगस्टला तर २३ व २४ ऑगस्टला घरेलू कामगारांचा मेळावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले .हा मेळावा घेतांना लोकप्रतिनीधीना कळविण्यात यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करावा तसेच खनीज विकास निधीचा उपयोग या सर्व घटकांच्या मदतीसाठी करावा. कोरोनामुक्त गावामध्ये जाऊन ॲण्टीबॉडीज टेस्ट कराव्यात, लसीकरणाची गती वाढवावी, कामगार नोंदणीला गती द्यावी, संजय गांधी निराधार योजनांचा लाभ द्यावा. विकासापासून कोणीच वंचित राहू नये या धोरणाचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.
कोरोनामुक्तीचा पॅटर्न
यावेळी कोरोनामुक्त गावांची यशकथा व सादरीकरण करण्यात आले. खुर्सापारचे संरपच सुधीर गोतमारे,कढोलीच्या संरपच प्रांजल वाघ,पिपळधरा गटग्रामपंचायतीच्या संरपच नलीनी शेरकुरे यांनी यावेळी गावाच्या कोरोनामुक्तीचा प्रवास सांगितला.या सर्वाच्या कामाचे श्रीमती गोऱ्हे यांनी कौतुक केले.
गावपातळीवर सरपंचानी लाऊडस्पीकर सिस्टीमचा चांगला उपयोग केला. गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप करणे, रोजगार हमी योजनेच्या कामावरील नागरिकांची ॲन्टीजन टेस्ट करणे, ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोनाविषयक उपाययोजनेसाठी उपक्रम राबविणे यामुळे सामुहीकपणे गावाला कोरोनाचा स्पर्श झाला नाही हे अभिनव असल्याचे श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. एक पालक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण, शिक्षण, त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे आदी बाबी महत्वाच्या आहेत. जी बालके अनाथ झाली आहेत व जेथे मुलींचे वय 10 वर्षांच्यावर व 18 वर्षाखाली आहे. तेथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कुटुंबाकडे प्रशासनाने गांर्भियाने लक्ष द्यावे. तसेच ही बालके बालमजूर म्हणून कुठेही काम करतांना आढळू नये, यासाठी अशा कुटुंबाचा नियमित आढावा घेण्याचे त्यांनी महिला व बालविकास तसेच पोलीस विभागाला निर्देशीत केले.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबातील विधवा स्त्रिया, बालके आदींची शहरी, ग्रामीण, ग्रामीण, शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब अशी वर्गवारी करावी. जेणेकरून शेतीच्या टप्प्यावर त्यांना काही गरज आहे का, याची माहिती घेऊन अशा कुटुंबांना मदत करता येईल. या बैठकीला सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Leave a Reply