संपादकीय संवाद – काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी परिवारवाद संपवणे गरजेचे

१३६ वर्ष जुन्या काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त द्यायचे असेल तर काँग्रेसला परिवारवादातून बाहेर यावे लागेल, अशा आशयाचे विधान काँग्रेसचे एक नेते नरेश गुजराल यांनी केले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. त्यामुळे या विषयावर आता देशभर चर्चा सुरु झाली आहे.
झाले असे, की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे अनेक नेते सिब्बल यांच्या घरी एकत्र जमले होते, त्यावेळी राजकीय चर्चा होणे साहजिकच होते, त्यानुसार झालेल्या चर्चेत हा सूर निघाल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केले आहे. नरेश गुजराल यांनी हे मत व्यक्त केल्यावर साहजिकच त्या बैठकीत वेगवेगळे सूर ऐकायला मिळाले असतील, यात शंका नाही. कारण आजही काँग्रेसमध्ये एक वर्ग असा आहे की तो पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या परिवारवादाचा कडवा समर्थक आहे.
काँग्रेसला बळकट करण्यासाठी परिवारवाद संपवण्याची गरज स्पष्ट करतानाच परिवारवादामुळे काँग्रेस कमजोर झाली हे सर्वच मान्य करतात त्यात चुकीचे काहीही नाही, एका काळात संपूर्ण देशावर काँग्रेसचे साम्राज्य होते. ही दीर्घकालीन सत्ता उपभोगतांना काँग्रेसने अनेक चुका केल्या कालांतराने त्या त्यांना भोवल्याही, मात्र परिवारवाद ही त्यांनी केलेली घोडचूक होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
काँग्रेसची स्थापना झाली १८८५ मध्ये त्यानंतर विसाव्या शतकात नेहरू परिवार काँग्रेसमध्ये सक्रिय झाला, १९४८ पर्यंत काँग्रेस पक्षावर महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. मात्र गांधींजवळ हट्ट करून पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचे पंतप्रधानपद आपल्या पदरात पाडून घेतले असे इतिहास सांगतो. १९४८ मध्ये गांधींचे निधन झाल्यावर नेहरूंनी संपूर्ण देशाची सूत्रे आपल्याकडे घेतली,काँग्रेस पक्षातही सर्वेसर्वा तेच होते. त्यांच्यानंतर त्यांची कन्या इंदिरा गांधी यांच्याकडे देशाची आणि पक्षाची सूत्रे आली, इंदिराजींनंतर त्यांचा मुलगा राजीवकडे सूत्रे आली. नंतर क्रमाक्रमाने सोनिया आणि आता राहुल जमल्यास प्रियांकासुद्धा असाच परिवारवाद काँग्रेसमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे या नेहरू-गांधी परिवाराच्या जेव्हा जेव्हा आव्हान देण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्षाची शकले झाली आहेत. अर्थात दरवेळी बहुसंख्य काँग्रेसजनांनी गांधी परिवाराला साथ दिली हे वास्तवदेखील नाकारता येत नाही.
जरी काँग्रेस पक्षाने हा परिवारवाद मानला तरी सामान्य जनतेने का मानावा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच १९८० आणि १९८४ या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या झोळीत भरभरून माप टाकणाऱ्या भारतीय मतदारांनी हळूहळू घराणेशाही नाकारायला सुरुवात केली आहे. १९८४ नंतर कधीही लोकसभेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. हळूहळू राज्यही त्यांच्या हातून जाऊ लागलीत आतातर लोकसभेत जेमतेम ५०च्या आसपास खासदार काँग्रेस पक्षाजवळ आहेत आणि बरीच राज्येही काँग्रेसच्या हातातून गेली आहेत. विशेष म्हणजे नेहरू-गांधी परिवाराच्या वर्चस्वामुळे महत्वाकांक्षा पूर्ण होऊ न शकलेल्या अनेक काँग्रेसजनांनी वेगळ्या चुली मांडत आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारात काँग्रेस हळूहळू खिळखिळी होत गेलेली आहे.
कॉंग्रेसजन आजही गांधी नेहरू परिवाराच्या बाजूने उभे राहतात म्हणजे काँग्रेसमध्ये पक्षाला आणि देशाला नेतृत्व देण्याची क्षमता असलेले इतर कुणीच नाहीत असा अर्थ काढता येतो. मात्र ती वास्तविकता नाही, काँग्रेसमध्ये अनेक सक्षम नेते आहेत. पूर्वीही होते त्यामुळे काँग्रेसमध्ये लोकशाही आणली गेली आणि नव्या सक्षम नेतृत्वाकडे पक्षाची धुरा सोपवली तर पक्षाला बरे दिवस येऊ शकतात. भारतीय जनता पक्षानेदेखील वाजपेयींननंतर अडवाणींना संधी दिली. मात्र अडवाणी सक्षम ठरत नाही हे दिसताच नरेंद्र मोदींना मैदानात आणलेच ना? हेच काँग्रेसलाही करावे लागेल. तरच काँग्रेसला देशात बरे दिवस येऊ शकतात. अन्यथा काँग्रेसची अवस्था अजूनच दयनीय होईल हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही.
काँग्रेस आज गांधी नेहरू परिवारातील राहुल गांधी आणि न जमल्यास प्रियांका गांधी यांच्यावर विसंबून आहे मात्र जी क्षमता नेहरू किंवा इंदिराजींमध्ये होती ती क्षमता हे दोघेही अजूनपर्यंत दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे परिवारवाद बाजूला सद्गरून नव्या नेतृत्वाचा प्रयोग करणे हेच श्रेयस्कर आहे. सर्व काँग्रेसजनांनी यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply