विधवा महिलेशी लग्नाचे ढोंग करून तिचे शारीरिक शोषण व फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

गोंदिया : ११ ऑगस्ट – सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तिशी मैत्री करणं गोंदियातील महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. विधवा महिलेशी मंदिरात लग्नाचं ढोंग रचून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोन लाख रुपयांची लूट करत तरुणाने पोबारा केला. आर्थिक फसवणुकीसोबतच आपलं लैंगिक शोषण झाल्याची तक्रार महिलेने नोदवली.
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्य प्रदेशातील एका इसमाने फेसबुकवर मैत्री केली. आधी लैंगिक शोषण करत नंतर त्याने महिलेशी लग्न केलं. तिच्याकडून १ लाख ९९ हजार रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच ३९ वर्षीय आरोपी दिलीप यादव याला गोंदिया पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
मध्य प्रदेशाच्या खंडोबा गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय दिलीप यादव या इसमाने कोरोना काळात गोंदिया शहरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. सोबतच दिलीप यादव या इसमाने गोंदियात येत २७ जुलै २०२० ते १ जून २०२१ या काळात गोंदियातील विविध हॉटेल-लॉज अशा ठिकाणी नेत तिच्याशी शारीरिक सबंध देखील प्रस्थपित केले होते.
पीडित महिला ही विधवा असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. आपल्या आधीच्या पत्नीला मी कंटाळलो आहे. मी तिला घटस्फोट दिला असल्याचं खोटं सांगत पीडितेशी गोंदियाच्या गायत्री मंदिरात त्याने लग्न देखील केले. काही दिवस तो तिच्यासोबत गोंदियात नवऱ्यासारखा राहिला.
तिच्याकडून १ लाख ९९ हजार रुपये घेत त्याने पुण्याला पळ काढला. दिलीप बरेच दिवस परत न आल्याने पीडितेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने गोंदिया शहर पोलीस ठाणे गाठत आरोपी दिलीप यादव याच्या विरुद्ध फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दिलीप यादव याला पुण्यातून अटक केली आहे.

Leave a Reply