बुलढाण्यात वनकर्मचारी आणि मेंढपाळांत तुफान हाणामारी, वनाधिकाऱ्यांनी केला हवेत गोळीबार

बुलडाणा : ११ ऑगस्ट – बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वनकर्मचारी आणि मेंढपाळांत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ४० ते ४५ जणांच्या एका जमावानं वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. संतप्त जमावाच्या तावडीतून आपल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांला बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडाव्या लागल्या आहेत. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात काही मेंढपाळ बेकायदेशीरपणे मेंढ्या चारायला येतात, अशी माहिती वनविभागाला मिळाली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही कर्मचारी वन क्षेत्रात गस्त घालत होते. दरम्यान पिंपळगाव नाथ भागात काहीजण बेकायदेशीरपणे मेंढ्या चारताना आढळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. यातून वादावादी झाल्यानंतर मेढपाळांनी लाठ्याकाठ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
वृत्तानुसार, वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण सुरू केल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचाचा जीव वाचवण्यासाठी बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. त्यामुळे तेथील १० ते १२ मेंढपाळांनी काढता पाय घेतला. त्यानंतर हे प्रकरण मिटलं असं वन कर्मचाऱ्यांना वाटलं. पण थोड्याच वेळात त्याठिकाणी ४० ते ४५ मेंढपाळाचा जमाव आला.
संबंधित सर्वांच्या हातात घातक शस्त्रे आणि लाठ्या-काठ्या होत्या. वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशानं ते सर्वजण एकत्र जमले होते. पण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं पुन्हा हवेत दोन गोळ्या झाडल्या. यामुळे मेंढपाळांनी नमती भूमिका घेतली आणि घटनास्थळावरून परत निघून गेले. यानंतर वन विभागाच्या कर्माचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या मेंढपाळांच्या गटाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply